Madhuri Dixit : ‘धक धक गर्ल’चा रिअल इस्टेटमध्ये धमाका! 1.94 कोटींचं घर विकलं दुप्पट किमतीत
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांनी मुंबईतील जुहू अपार्टमेंट 4.40 कोटींना विकले, ज्यात 14वर्षांत 127% नफा मिळाला. त्यांनी ते1.94 कोटींना खरेदी केले होते. हा त्यांच्या आठ महिन्यातील तिसरा मालमत्ता व्यवहार आहे. यापूर्वी अंधेरीतील कार्यालयही 4.85 कोटींना विकून 824 % नफा कमावला. त्यांच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीची प्रचंड चर्चा आहे.

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि त्यांचे पती डॉ. श्रीराम माधव नेने सध्या त्यांच्या रिअल इस्टेट व्यवहारांमुळे चर्चेत आहेत. ऑफीसपाठोपाठ आता या दाम्पत्याने मुंबईतील पॉश जुहू परिसरातील आणखी एक अपार्टमेंट तब्बल 4.40 कोटी रुपयांना विकले आहे. विशेष म्हणजे, हे घर त्यांनी जवळपास 14 वर्षांपूर्वी 1.94 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे या व्यवहारातून त्यांना सुमारे 127 टक्के नफा मिळाला आहे. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, हा व्यवहार 3 जुलै 2026 रोजी नोंदवण्यात आला. या व्यवहारासाठी खरेदीदाराने 26.40 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं. बॉलिवूड ब्युटी क्वीनच्या विक्रीची प्रचंड चर्चा सध्या सुरू आहे.
माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांनी विकलेलं हे अपार्टमेंट जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट (JVPD) स्कीममधील Military Road येथील Iris Park इमारतीत आहे. हे घर The Deep Varsha Co-operative Housing Society Ltd. चा भाग आहे. कागदपत्रांनुसार, अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 774 चौरस फूट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शेकर शेट्टी यांनी हे अपार्टमेंट खरेदी केले आहे. या मालमत्तेशी संबंधित स्टिल्ट पार्किंगची जागा मात्र यापूर्वीच स्वतंत्रपणे विकण्यात आली होती. 15 डिसेंबर 2025 रोजी पार्किंगची जागा दुसऱ्या खरेदीदाराला विकण्यात आली होती.
2012 मध्ये 1.94 कोटींना खरेदी
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी हे घर 4 जून 2012 रोजी 1.94 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता तब्बल 4.40 कोटी रुपयांना विक्री झाल्याने त्यांच्या गुंतवणुकीच्या मूल्यात 14 वर्षांच्या कालावधीत लक्षणीय वाढ झाली आहे. खरेदी किंमतीच्या तुलनेत ही वाढ सुमारे 127 टक्के आहे.
8 महिन्यात विकली तिसरी प्रॉपर्टी
माधुरी दीक्षित यांच्या मुंबईतील प्रॉपर्टी व्यवहारांची ही मालिका विशेष लक्षवेधी ठरली आहे. गेल्या आठ महिन्यांत त्यांनी तिसरी मालमत्ता विकली आहे. डिसेंबर 2025 मध्ये या दाम्पत्याने याच जुहू परिसरातील इमारतीमधील 780.13 चौरस फुटांचे आणखी एक अपार्टमेंट 3.90 कोटी रुपयांना विकले होते. हे घर त्यांनी 13 वर्षांहून अधिक काळापूर्वी 1.95 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या व्यवहारातून मालमत्तेच्या किमतीत जवळपास 99.22 टक्के वाढ झाली. यानंतर जून 2026 मध्ये त्यांनी अंधेरी पश्चिम येथील व्यावसायिक कार्यालयाची जागा 4.85 कोटी रुपयांना विकली.
52 लाखांचं ऑफिस थेट 4 कोटींना !
माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांनी विकलेली कार्यालयीन जागा ओशिवरा येथील Morya Landmark II Premises Co-operative Society Ltd. च्या चौथ्या मजल्यावर होती. तब्बल 18 वर्षांपूर्वी 52.5 लाख रुपयांना खरेदी केलेल्या या ऑफिसची विक्री आता 4.85 कोटी रुपयांना झाली.
या व्यवहारामुळे कार्यालयाच्या किमतीत तब्बल 824 टक्के वाढ झाली आहे. 1,594.24 चौरस फूट कार्पेट एरिया असलेली ही कार्यालयीन जागा Frames Production Company Private Limited यांनी खरेदी केली. या व्यवहारात तीन कार पार्किंगच्या जागांचाही समावेश होता.
जुहूला सेलिब्रिटींची पहिली पसंती
मुंबईतील जुहू परिसर हा बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अमिताभ बच्चन, वरुण धवन यांच्यासह अनेक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांचे घर या परिसरात आहे. मुंबईतील प्रमुख फिल्म स्टुडिओजच्या जवळचे स्थान, समुद्रकिनाऱ्याची जवळीक आणि आलिशान अपार्टमेंट्स व बंगल्यांमुळे जुहूची मागणी सातत्याने असते. स्थानिक प्रॉपर्टी ब्रोकर्सच्या माहितीनुसार, जुहूमधील निवासी मालमत्तांचे दर सध्या प्रति चौरस फूट 60 हजार ते 1 लाख रुपये इतके आहेत. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या या सलग मालमत्ता विक्रीमुळे आता त्यांच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओकडेही चाहत्यांचे आणि इंडस्ट्रीचे लक्ष वेधले गेले आहे.