
मुंबई शहराच्या जडणघडणी गिरणी कामगारांचं मोलाचं योगदान आहे. 1982 मधील संपामुळे हा गिरणी कामगार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. अनेक गिरण्या बंद पडल्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले. या कामगारांना घरं मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या गिरणी कामगारांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. महेश मांजरेकर हे वडाळ्यात राहायचे, त्यामुळे तिथे अनेक गिरणी कामगारांची मुलं त्यांचे मित्र होते. त्यांचा संघर्ष डोळ्यांसमोर पाहिल्याने, मी कधीच फिनिक्स मॉलमध्ये शॉपिंगला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.
“मी वडाळ्याला राहायचो. आजूबाजूला सगळे मिडलक्लास होते. समोर स्प्रिंग मिल, त्याच्यापुढे कोहीनूर मिल.. त्यामुळे आम्ही ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचो, ती सगळी मिल कामगारांची मुलं होती. मिल कामगारांच्या संपाचा मला अजूनही खूप त्रास होता. आमच्यासोबत मोहन नावाचा एक मुलगा क्रिकेट खेळायचा, नंतर तो गँगमध्ये गेला आणि त्याचा एन्काऊंट झाला. अशी इतरही खूप लोकं होती. सकाळी स्प्रिंग मिलचा भोंगा वाजला की सात वाजले, मग तीन वाजले.. यावरून आम्हाला टाइम कळायचा. मिल कामगारांच्या मुलांचं आयुष्य मला माहीत होतं.”
“त्यानंतर ‘आमच्या या घरात’ नावाचं एक नाटक आलं होतं. त्याने प्रभावित होऊन मी चित्रपट लिहिला. तिकडचं आमचं जे आयुष्य होतं, आमचे खूप मित्र आहेत तिथे मिलवाले. त्याचा त्रास मला अजूनही होतो. मी फिनिक्स मॉलमध्ये कधीच शॉपिंग करत नाही. कधीच नाही. माझी बायको मला नेहमी म्हणते, पण माझं म्हणणं आहे की इथे खूप लोकं मेली आहेत. हे मॉल जे उभं राहिलंय, ते कोणाच्या तरी प्रेतांवर उभं राहिलंय, असं माझं कायम म्हणणं आहे. माझी बायको, मुलं तिथे शॉपिंग करतात. पण मी साधा रुमालसुद्धा तिथून घेत नाही. मी तिथे जातच नाही. हे माझ्याकडून एक प्रकारचं आंदोलन आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
याविषयी ते पुढे म्हणाले, “मला त्याचा त्रास होतो. ते मिल कामगार कुठे आहेत? त्यांना काय मिळालं? काहीच नाही. माझ्या चित्रपटात एक वाक्य आहे की, महाराष्ट्राला मुंबई मिळाली, त्याच्यात लाखो कामगार आणि शेतकरी मेले. त्याचं प्रतीक फक्त एकच आहे, तो पुतळा.”