
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी माही विज आणि जय भानुशाली यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती. आमच्या कथेत ‘विलेन’ कोणीच नाही, आम्हाला कोणताच ड्रामा नकोय.. असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं. जय-माहीच्या घटस्फोटाने अनेकांना धक्का बसला, तर काहींनी त्यावरून त्यांना ट्रोल केलं. जर घटस्फोट घ्यायचा होता, तर मुलांना का दत्तक घेतलं, असा सवाल काहींनी केला. यावर आता माहीने तिच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिलं आहे. माहीने या ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली आहे. घटस्फोटाचा निर्णय आम्ही परस्पर संमतीने घेतल्याचं तिने स्पष्ट केलं.
या व्लॉगमध्ये माही म्हणाली, “जय आणि माझा घटस्फोट झाला असला तरी आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. आम्ही दोघंही शांतताप्रिय आहोत. आम्हाला कुठलाच ड्रामा किंवा संघर्ष अजिबात आवडत नाही. आम्ही विभक्त होण्याचा निर्णय दोघांनी मिळून घेतला आहे. मी कमेंट सेक्शन पाहिलं तेव्हा एकाने विचारलं की, जर तुम्हाला घटस्फोट घ्यायचा होता तर तुम्ही मुलांना का दत्तक घेतलं? त्यांना मी सांगू इच्छिते आमचं बँक खातं रिकामं झालेलं नाही. आम्ही मुलांची काळजी घेऊ शकतो. जय कुठेतरी पळून गेलाय किंवा माझ्याकडे काहीही असं नाहीये. आम्ही तिन्ही मुलं याआधी जसं जगत होती, तसंच पुढेही त्यांचं आयुष्य जगतील.”
माही पुढे म्हणाली, “उलट माझ्या मुलांसाठी हे एक चांगलं उदाहरण आहे की जर गोष्टी जमल्या नाहीत तर तुम्हाला एकमेकांवर चिखलफेक करण्याची किंवा कोर्टात खेचण्याची, गोंधळ निर्माण करण्याची, तुमच्या मुलांना त्याच ओढण्याची गरज नाही. माझ्या मुलांना माझा आणि जयचा अभिमान असेल, कारण जेव्हा त्यांच्या पालकांना समजलं की त्यांना सोबत पुढे जायचं नाही, तेव्हा त्यांनी सौहार्दपूर्णपणे नातं संपवलं. मी आणि जय कायम चांगले मित्र राहू. आम्ही दोघंही मुलांची समान जबाबदारी घेऊ. आमची मुलं अनाथ झाली आहे किंवा त्यांना आम्ही रस्त्यावर सोडलंय असं नाहीये. मुलांना त्यांच्या हक्काचं सर्वकाही मिळेल.”
जयपासून विभक्त झाल्यानंतर माहीने तिच्या तारा, खुशी आणि राजवीर या तीन मुलांसाठी कोणताही पोटगीची किंवा देखभालीसाठीची रक्कम स्वीकारलेली नाही. घटस्फोटाचा निर्णय परस्पर संमतीने होता, म्हणून दोघांनी कोणत्याही वादविवादाशिवाय नातं संपवण्याचा निर्णय घेतला.