घटस्फोटानंतर माहीने जयकडून किती मागितली पोटगी? माहिती समोर
जय भानुशालीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री माही विजने त्याच्याकडून किती पोटगी मागितली, याबद्दलची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या चौदा वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना तीन मुलं आहेत.

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेली जय भानुशाली आणि माही विज यांनी घटस्फोट जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. लग्नाच्या 14 वर्षांनंतर या दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. कोर्टात अर्ज दाखल केल्यापासून दोघं वेगवेगळे राहत होते. जय आणि माहीला तीन मुलं असून त्यापैकी दोघांना त्यांनी दत्तक घेतलं होतं. या तिन्ही मुलांचा सांभाळ दोघं मिळून करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या घटस्फोटादरम्यान माहीने जयकडून किती पोटगी मागितली, याविषयी नेटकऱ्यांनी सवाल केला. याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.
कायदेशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहीने घटस्फोटानंतर जयकडून पोटगी घेण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी असंही सांगितलं की माही आणि जय यांनी त्यांच्या नात्यासाठी बराच वेळ देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतरही सर्वकाही सुरळीत न झाल्याने त्यांनी अखेर शांततापूर्ण मार्गाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जयपासून विभक्त झाल्यानंतर माहीने तिच्या तारा, खुशी आणि राजवीर या तीन मुलांसाठी कोणताही पोटगीची किंवा देखभालीसाठीची रक्कम स्वीकारलेली नाही. घटस्फोटाचा निर्णय परस्पर संमतीने होता, म्हणून दोघांनी कोणत्याही वादविवादाशिवाय नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
माही आणि जय या दोघांच्या जवळच्या लोकांना माहीत आहे की घटस्फोट घेण्यापूर्वी त्यांनी लग्न वाचवण्याची खूप प्रयत्न केले होते. तरीही त्यांच्यातील दुरावा कायम राहिला, असंही सूत्रांनी स्पष्ट केलं. असं असलं तरी घटस्फोटानंतरही दोघांमध्ये मैत्री कायम राहणार असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. सध्या जय आणि माही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, करिअरवर आणि तिन्ही मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
जय आणि माहीने काही वर्षे डेट केल्यानंतर 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर बरेच प्रयत्न करूनही मूल होत नसल्याने दोघांनी 2017 मध्ये राजवीर आणि खुशी यांना दत्तक घेतलं. त्याच्या दोन वर्षांनंतर 2019 मध्ये माहीने मुलीला जन्म दिला, जिचं नाव त्यांना तारा असं ठेवलं. तारा ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक असून सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
