लग्नाच्या 14 वर्षांनंतर जय भानुशाली-माही विज यांचा घटस्फोट; म्हणाले ‘या कथेत विलेन..’
जय भानुशाली आणि माही विज यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे. जॉइंट स्टेटमेंट जाहीर करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या जोरदार चर्चा होत्या. अखेर दोघांनी एकत्र स्टेटमेंट देत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जय आणि माहीने एकत्र स्टेटमेंटची पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू आणि या कथेत कोणीच ‘विलेन’ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. लग्नाच्या तब्बल 14 वर्षांनंतर जय आणि माही विभक्त झाले आहेत. या दोघांना तीन मुलं आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात समस्या होत्या. दोघांनीही आपलं नातं वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेव्हापासून दोघं वेगवेगळे राहत होते.
जय आणि माहीची पोस्ट-
‘आयुष्याच्या या प्रवासात आज आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. तरीही आम्ही एकमेकांना साथ देत राहू. शांती, प्रगती, दयाळूपणा आणि माणुसकी ही नेहमीच आमची आयुष्यात मार्गदर्शक मूल्ये राहिली आहेत. आमची मुलं- तारा, खुशी आणि राजवीर यांच्यासाठी आम्ही सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम मित्र बनून राहू. त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते करण्यासाठी आणि जे काही भविष्यात करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

घटस्फोटाबाबत त्यांनी पुढे म्हटलंय, ‘जरी आम्ही वेगवेगळा मार्ग निवडला असला तरी या कथेत कोणीच खलनायक नाही आणि या निर्णयाशी कोणतीही नकारात्मकता जोडलेली नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी कृपया हे जाणून घ्या की आम्ही ड्रामापेक्षा शांतता आणि इतर सर्व गोष्टींपेक्षा सामंजस्याला महत्त्व देतो. आम्ही नेहमीप्रमाणे एकमेकांचा आदर करत राहू, एकमेकांना पाठिंबा देत राहू आणि मित्र म्हणून परस्पर आदरासह राहू. आयुष्यात पुढे जात असताना तुमच्याकडून आदर, प्रेम आणि दयाळूपणाची आम्ही अपेक्षा करतोय.’
माही आणि जय यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 2017 मध्ये त्यांनी राजवीर आणि खुशी या दोन मुलांना दत्तक घेतलं. त्यानंतर 2019 मध्ये माहीने मुलीला जन्म दिला. तारा असं तिचं नाव असून सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे.
