Jay Bhanushali Mahhi Vij Divorce: लग्नाच्या 14 वर्षांनंतर जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट; 3 मुलांना सांभाळणार कोण?
लग्नाच्या 14 वर्षांनंतर जय भानुशाली आणि माही विज यांनी घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात बऱ्याच समस्या सुरू होत्या. अखेर टेलिव्हिजनवरील ही लोकप्रिय जोडी विभक्त झाली आहे, या दोघांना तीन मुलं आहेत.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत पॉवरफुल जोडप्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या जय भानुशाली आणि माही विज यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या 14 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले आहेत. जय आणि माही यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतल्याचं कळतंय. या दोघांना तीन मुलं आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात समस्या होत्या. दोघांनीही आपलं नातं वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेव्हापासून दोघं वेगवेगळे राहत होते.
याआधी जुलै महिन्यात जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. आता दोघांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. परस्पर संमतीने त्यांनी हे नातं संपवल्याचं कळतंय. 40 वर्षीय जय भानुशाली हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आणि सूत्रसंचालक आहे. तर 43 वर्षीय माही विज ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘लागी तुझसे लगन’ आणि ‘लाल इश्क’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. या दोघांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
लग्नाच्या सहा वर्षांनंतर जय आणि माहीने 2017 मध्ये दोन मुलांना दत्तक घेतलं होतं. त्यांच्या मुलाचं नाव राजवीर असून दुसरी मुलगी खुशी आहे. त्याच्या दोन वर्षांनंतर 2019 मध्ये माहीने IVF च्या माध्यमातून मुलगी ताराला जन्म दिला. घटस्फोटानंतर दोघं मिळून तीन मुलांचं संगोपन करणार असल्याचं कळतंय.
View this post on Instagram
माही आणि जयची मुलगी तारा आता सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. ती लहान वयातच सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बनली. ताराच्या इन्स्टाग्राम पेजला दोन लाखांहून अधिक नेटकरी फॉलो करतात. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही ताराची लोकप्रियता आहे.
माही आणि जय यांच्या नात्यात 2014 मध्येच फूट पडल्याचं म्हटलं जातं. तेव्हा जयचा ‘हेट स्टोरी 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने अभिनेत्री सुरवीन चावलासोबत इंटिमेट सीन्स दिले होते. यामुळे जय आणि माही यांच्यात नात्यात फूट पडली होती. नंतर दोघांनी हे वृत्त फेटाळले होते.
