‘लपंडाव’मध्ये धमाकेदार ट्विस्ट; ‘आई कुठे..’ फेम अभिनेत्री पहिल्यांदा दुहेरी भूमिकेत, तेजस्विनी-मनस्विनीचं उलगडणार रहस्य

'लपंडाव' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये मोठ्या रहस्याचा उलगडा होणार आहे. तेजस्विनी आणि मनस्विनी या हुबेहुब दिसणाऱ्या पात्रांचं रहस्य प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

लपंडावमध्ये धमाकेदार ट्विस्ट; आई कुठे.. फेम अभिनेत्री पहिल्यांदा दुहेरी भूमिकेत, तेजस्विनी-मनस्विनीचं उलगडणार रहस्य
Rupali Bhosle
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2025 | 9:28 AM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ या नव्या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत सखी आणि कान्हाच्या लग्नाची धामधूम सुरु असतानाच एक महत्त्वाचं रहस्य उलगडणार आहे. सरकार अर्थात तेजस्विनी कामत ज्या व्यक्तीला गुपचूपपणे भेटते ती व्यक्ती नेमकी कोण? हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून सरकारची जुळी बहीण आहे. तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन सख्या बहिणी. मात्र पैसा आणि सत्तेच्या लालसेपोटी मनस्विनीने बारा वर्षांपूर्वी आपली सख्खी बहीण तेजस्विनीला किडनॅप करुन तिची जागा घेतली आणि सरकार बनून कामत ब्रँडची अनभिषिक्त सम्राज्ञी झाली. त्यामुळे प्रेक्षकांना वाटत असलेली तेजस्विनी ही तेजस्विनी नसून ती मनस्विनी असल्याचा मोठा खुलासा मालिकेत होणार आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले तेजस्विनी आणि मनस्विनी या एकसारख्या दिसणाऱ्या दोन्ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. करिअरमध्ये पहिल्यांदाच ती डबलरोल साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना रुपाली म्हणाली, “सरकार तिच्या मुलीशी म्हणजेच सखीशी अशी का वागते? ती कुणाला भेटते? तिचा मनसुबा नेमका काय आहे? हे आणि असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून सतावत होते. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत. तेजस्विनी ही तेजस्विनी नसून मनस्विनी असल्याचं सत्य उलगडणार आहे.”

“तेजस्विनी बनून जगणारी मनस्विनी भावनाशून्य आहे. तिचं सगळं आयुष्य पैसा आणि सत्तेभोवती फिरतं. तर तेजस्विनी मात्र अत्यंत दयाळू आणि प्रेमळ. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की मनस्विनी आणि तेजस्विनी या एकसारख्या दिसणाऱ्या मात्र दोन वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली. दोन्ही व्यक्तिरेखा खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे लूक आणि देहबोलीवर प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. थोडी कसरत होतेय, दोन्ही पात्र साकारताना कलाकार म्हणून मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतेय,” असं ती पुढे म्हणाली. अनेक रहस्यांनी गुंफलेला हा नात्यांचा ‘लपंडाव’ दररोज दुपारी 2 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव ही सखी कामत हे पात्र साकारतेय. ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली कृतिका ही अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आहे.