गर्दीचा फायदा घेत अभिनेत्रींना चुकीचा स्पर्श; मॉलमध्ये घडली घटना

मॉलमध्ये दोन अभिनेत्रींसोबत गैरवर्तणुक; पोलिसांकडून तपास सुरू

गर्दीचा फायदा घेत अभिनेत्रींना चुकीचा स्पर्श; मॉलमध्ये घडली घटना
गर्दीचा फायदा घेत अभिनेत्रींना चुकीचा स्पर्श
Image Credit source: Youtube
| Edited By: | Updated on: Sep 28, 2022 | 7:46 PM

मुंबई- हल्ली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध फंडे अंमलात आणले जातात. मॉलमध्ये (Hilite Mall) एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन करण्याचा सध्या ट्रेंडच आला आहे. मात्र याच प्रमोशनदरम्यान गैरवर्तणूक झाल्याचा आरोप दोन अभिनेत्रींनी केला आहे. या घटनेनंतर एका अभिनेत्रीने (Actress) आरोपीच्या कानशिलातही लगावली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पोलिसांनीही या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मल्याळम चित्रपटाच्या एका अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्यासोबत आणि तिच्या सहकलाकारासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. ‘सॅटर्डे नाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दोघी अभिनेत्री केरळमधील कोझिकोड इथल्या हिलाइट मॉलमध्ये पोहोचल्या होत्या. या मॉलमध्येच अभिनेत्रींसोबत गैरवर्तणूक झाली.

‘मॉलमध्ये आम्ही प्रमोशनसाठी पोहोचलो होतो. सर्वकाही ठीक चालू होतं. ज्यांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं, त्यांचे मी आभार मानते. मॉलमध्ये प्रचंड गर्दी जमली होती आणि त्यामुळेच सुरक्षारक्षकांना खूप संघर्ष करावा लागला. कार्यक्रम संपल्यानंतर मी आणि माझी को-स्टार तिथून निघून होतो, तेव्हा काही पुरुषांनी माझ्या को-स्टारसोबत गैरवर्तणूक केली. गर्दी खूप असल्याने ती काहीच बोलू शकली नाही. पण थोड्या वेळानंतर तीच घटना माझ्यासोबत घडली तेव्हा रागाच्या भरात मी त्या व्यक्तीच्या कानाखाली मारली. माझी प्रतिक्रिया सर्वांनी व्हिडीओत पाहिलीच असेल. कोणावरही अशा घटनेचा सामना करण्याची वेळ येऊ नये. महिलांसोबत घडणाऱ्या अशा घटनांविरोधात आवाज उठवला पाहिजे’, अशी पोस्ट तिने लिहिली.

संबंधित अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका व्यक्तीला कानाखाली मारताना दिसतेय.