पोलिसांची नजर चुकवत सलमानच्या अपार्टमेंटमध्ये शिरला तरुण अन्…

पोलिसांची नजर चुकवत सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या तरुणाला ताब्यात घेण्यात यश मिळालं आहे. एका कारमागे लपून या तरुणाने इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी त्याला इमारतीबाहेर घुटमळताना पाहिलं गेलं होतं.

पोलिसांची नजर चुकवत सलमानच्या अपार्टमेंटमध्ये शिरला तरुण अन्...
सलमान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2025 | 1:30 PM

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अचानक प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांची नजर चुकवत कारच्या मागे लपून सलमानच्या इमारतीत प्रवेश करण्यात त्या व्यक्तीला यश आलं. मात्र वेळीच संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सलमानच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचं नाव जितेंद्रकुमार सिंह असून तो छत्तीसगढ इथला राहणार आहे. इमारतीत प्रवेश करण्याच्या काही तासांपूर्वी जितेंद्रकुमार सिंहला गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर फिरताना पोलिसांनी हटकलंसुद्धा होतं. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 329 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या इमारतीत प्रवेश करण्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं जातंय. याआधी अभिनेता सैफ अली खानच्या घरात बांगलादेशी नागरिक चोरीच्या उद्देशाने शिरला होता. त्याच्यासोबत झटापट केली असता चोराने सैफवर चाकूने वार केले होते.

23 वर्षीय जितेंद्रकुमारला सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ फिरताना पाहिलं गेलं. इमारतीबाहेर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला हटकलं आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. यामुळे संतापलेल्या जितेंद्रकुमारने त्याचा मोबाइल जमिनीवर फेकून दिला. त्यानंतर तो त्याच इमारतीत राहण्याच्या एका व्यक्तीच्या कारमागून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरला. यावेळी मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने सलमानला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. पोलीस मला सलमानला भेटू देत नव्हते म्हणून मी लपण्याचा प्रयत्न करत होतो, असं तो म्हणाला.

यावर्षी जानेवारी महिन्यातच सलमानने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचं नुतनीकरण करून त्याची सुरक्षा अधिक वाढवली होती. सलमानच्या घराबाहेर अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. त्याची एक गोळी सलमानच्या घराच्या बाल्कनीच्या भिंतीलाही लागली होती. या घटनेच्या आठ महिन्यांनंतर सलमानने त्याच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काच बसवली आहे. बुलेटप्रूफ बाल्कनीसोबतच मॉडर्न सिक्युरिटी सिस्टिम आणि हाय रिझॉल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सलमान त्याच्या घरातील बाल्कनीमधून अनेकदा चाहत्यांना अभिवादन करतो. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या ग्राऊंड फ्लोअरवर सलमान राहत असून त्याचे आईवडील पहिल्या मजल्यावर राहतात. गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी बाईकवर आलेल्या दोन व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील गुंडांनीच हा गोळीबार केल्याचा संशय आहे. बिष्णोईकडून सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.