
ओटीटी हे मनोरंजनाचं असं माध्यम आहे, ज्यावर चित्रपट आणि वेब सीरिज पाहणं अनेकांना आवडतं. प्रत्येक आठवड्यात ओटीटीवर एकापेक्षा एक दमदार थ्रिलर सीरिज किंवा चित्रपट प्रदर्शित केले जातात. या वीकेंडलाही एक हिंदी वेब सीरिज ऑनलाइन स्ट्रीम होत आहे. या सीरिजचे एकूण आठ एपिसोड्स असून आठही भाग अत्यंत रोमांचक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत. ओटीटीवर येताच ही वेब सीरिज ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे. सध्या सोशल मीडियावरही याचीच चर्चा आहे.
ज्या वेब सीरिजचा उल्लेख केला जातोय, ती शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये काळी जादू आणि यंत्राची एक गूढ कथा दाखवण्यात आली आहे. विचित्र पद्धतीने लोकांची हत्या होणं आणि त्यांच्या मृतदेहांमधून एक किंवा दुसरा शरीराचा भाग गायब होणं हे सर्वांसाठी चिंतेचं कारण बनतं.
या प्रकरणांचा तपास करण्यासाठी एका महिला सीआयडी अधिकाऱ्याला राज्यात बोलावलं जातं आणि त्यानंतर सीरिजचा खरा खेळ सुरू होतो. अंधश्रद्धा आणि व्यवस्था यांच्यातील रहस्यावर आधारित या वेब सीरिजचा सस्पेन्सचा जबरदस्त तडका आहे. यामुळे ही अधिक खास बनते. या वेब सीरिजचं नाव आहे ‘मंडला मर्डर्स’.
अभिनेत्री वाणी कपूरची ही क्राइम थ्रिलर सीरिज सध्या खूप चर्चेत आहे. एका काल्पनिक कथेवर आधारित ही सीरिज नुकतीच प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आली आहे. या सीरिजचे एकूण आठ भाग आहेत. उत्तम कंटेंट आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये नंबर वनवर आहे. या सीरिजला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या सीरिजमध्ये वाणी कपूरसोबत सुरवीन चावला, वैभव राज गुप्ता आणि श्रिया पिळगांवकर यांच्याही भूमिका आहेत. प्रत्येक वळणावर या सीरिजच्या कथेत एक नवीन बदल होतो. क्लायमॅक्सपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. या वेब सीरिजचा दुसरा सिझनसुद्धा यावा, अशी मागणी प्रेक्षकांकडून होत आहे. सीरिजच्या निर्मात्यांनी अद्याप दुसऱ्या सिझनची कोणतीच घोषणा केली नाही.