भाजपच्या एका बड्या नेत्याने खाल्ला शाकाहारी मासा? नेमकं सत्य काय?

या भाजप नेत्याचे मासे खातानाचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अखेर त्यावर त्यांनी मौन सोडलं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

भाजपच्या एका बड्या नेत्याने खाल्ला शाकाहारी मासा? नेमकं सत्य काय?
fish
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 28, 2026 | 2:27 PM

भोजपुरी स्टार आणि भाजप नेते मनोज तिवारी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. मनोज तिवारी यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. मासे खाण्यावरून त्यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्यामुळेच ही चर्चा होत आहे. एकीकडे नेटकरी त्यावरून भन्नाट मीम्स तयार करून व्हायरल करत आहेत, तर दुसरीकडे आता मनोज तिवारी यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे. मी मासे खात नाही आणि खाल्लंही नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलंय. परंतु जे लोक मासे खातात, त्यांचा मी विरोधही करत नाही, असं ते पुढे म्हणाले.

‘न्यूज पिंच’शी बोलताना मनोज तिवारी यांनी भारताच्या विविधतेवर जोर देत सांगितलं की, वेगवेगळ्या राज्यांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी आणि इतर परंपरा वेगळ्या असतात. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. यावेळी त्यांनी उदाहरण देत सांगितलं की पश्चिम बंगालमधील ब्राह्मणसुद्धा मासे खातात आणि बिहारमध्ये मैथिली ब्राह्मणांमध्येही ही परंपरा धार्मिक गोष्टीशी संबंधित आहे. यावेळी मनोज तिवारी यांनी स्पष्ट केलं की त्यांचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही. “जर आम्ही खात नसलो तरी त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही दुसऱ्यांना खाण्यापासून रोखावं”, असं ते म्हणाले.

स्पष्टीकरण देत ते पुढे म्हणाले, “हे पहा, मी तर मासे खात नाही. पण हा मुद्दा इतका का मोठा बनवला जातोय? हाच मोठा प्रश्न आहे. मी तर मासे खाल्ले नाही, मी फक्त त्याबद्दल बोलत होतो. तेसुद्धा सार्वजनिकरित्या त्याबद्दल बोलत होतो. कृपया कोणीही संभ्रमात राहू नका. याची चर्चा यासाठी होत आहे कारण ममताजींनी सांगितलं होतं की बंगालमध्ये भाजप जिंकून आला तर आम्ही मासे बंद करू. बंगालमध्ये मासे खाणं हा मोठा मुद्दा बनवण्यात आला आहे. त्यांचा हा खूप मोठा कट आहे. या कटाला विरोध करण्यासाठी मला त्यावर बोलणं गरजेचं होतं.”

मनोज तिवारी यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे मासे खातानाचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु हे सर्व फोटो एआय जनरेटेड असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे अभिनेते आणि राजकारणी रवी किशन यांनी सांगितलं की, आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणून बंगालच्या तलावात सोडू. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. त्याआधी 142 जागांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी पदयात्रा आणि रॅली काढल्या. तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा पार पडल्या.

Follow Us