तर कधीच होणार नाही घटस्फोट, मराठी अभिनेत्याने सांगितलं संसार फुलवण्यासाठी काय करावं?

आजकाल संसार मोडण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. पण संसार टिकवण्यासाठी काय काय करायला हवं, हे एका अभिनेत्याने सांगितले आहे.

तर कधीच होणार नाही घटस्फोट, मराठी अभिनेत्याने सांगितलं संसार फुलवण्यासाठी काय करावं?
marriage couple (फोटो सौजन्य-मेटा एआय)
| Updated on: May 24, 2025 | 7:26 PM

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना देण्यासाठी फार कमी वेळ शिल्लक राहतो. नवरा-बायकोदेखील एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत, अशी परिस्थिती आली आहे. त्यामुळेच हल्ली घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मात्र संसार टिकवण्यासाठी दोघांनीही समान मेहनत घ्यावी लागते. संसार टिकवण्यासाठी काही किमान बाबी सांभाळाव्या लागतात. याबाबतच मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले आहे. दामले यांचा हा व्हिडीओ जुना आहे. पण संसार टिकवण्यासाठी त्यांनी दिलेल्या या टिप्स आजघडीला तंतोतंत लागू होतात.

प्रशांत दामले यांनी काय सांगितलं?

आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. माझ्या संसाराला 36 वर्षे झाली. लोकांच्या संसाराला 40 वर्षे, 50 वर्षे होतात. या लोकांच्या संसारात भांडणं नसतील का? भांडणं असणारच. मतभेद असणारच. मतभेद आणि भांडण या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. या दोन्ही गोष्टी संसारात असणार. पण थांबायचं कुठं हे या लोकांना माहिती आहे म्हणूनच त्यांचे संसार टिकून आहेत, असे मत दामले यांनी व्यक्त केले.

वेळ न दिल्यास एकमेकांना ओळखणार कसं?

तसेच, याच्या पुढे भांडणं झाली तर वांदे होतील, हे मात्र माहिती असलं पाहिजे. हे समजण्यासाठी बायको आणि नवरा या दोघांनीही एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे. वेळ न दिल्यास एकमेकांना ओळखणार कसं? असा सवालही त्यांनी केला.

असं बोलून दाखवलं तर चालेल का?

पैसे कमवण्यासाठी आपण जे नियम बाहेर पाळतो. आपण घरासाठी पैसे कमवून आणतो. पण ते बोलून दाखवणं चुकीचं आहे. मी अमुक एखादी गोष्ट तुझ्यासाठीच करतो, असं बोलून दाखवलं तर चालेल का? चालणार नाही, असे सांगत संसारात उपकारभाव नसावा, असे दामले यांनी सांगितले.

संसारात नियम, अटी जास्त असतात

संसारात नियम आणि अटी या जास्त लागू होतात. प्रियकर किंवा प्रेयसी हे फार तर चार ते पाच तास भेटतात. नवरा आणि बायको हे 24 तास सोबतच असतात. 24 तास भेटल्यानंतरच एकमेकांचे स्वभाव कळतात, असं मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले.