Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचं मोठं पाऊल, मंत्रीमंडळ बैठक आणि..
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शोकात असताना, सुनेत्रा पवार यांनी दु:ख बाजूला ठेवून कर्तव्याचे पालन करत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज त्या औपचारिकपणे पदभार स्वीकारणार असून, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक मंत्रालयांची तसेच पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतील. हे पाऊल त्यांच्या नेतृत्वाची आणि कर्तव्याची जाणीव दर्शवते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pwar) यांच्या निधनाला जवळपास 15 दिवस होत आले आहेत. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला जात असताना लँडिंग दरम्यान त्यांचं विमान क्रॅश होऊन मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी 4 जणांचा, एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित दादांच्या जाण्याने अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पवार कुटुंबाला तर प्रचंड धक्काच बसला. अजित पवार यांच्या विमान अपघाताटे अनेक व्हिडओ पुढे आले, अनेक तर्क-वितर्कही व्यक्त करण्यात आले. त्यानंतर 29 जानेवारी रोजी शोकाकुल वातावरणात बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची मुलं, पत्नी आणि सर्व कुटुंबीय प्रचंड दु:खात आहेत, त्यांच्या जाण्यावर कोणाचा विश्वासच बसत नाहीये. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या अश्रूंना खळ नव्हता. मात्र तरीही त्यांनी त्यांचं दु:ख बाजूला ठेवत कर्तव्याला प्राधान्य दिलं. अजित पवार यांच्या निधनानंतर 4 दिवसांत, शनिवार 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, त्यानंतर लोकभवन येथे जाऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लोकभवनामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या.
आज स्वीकारणार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार
त्यांच्या शपथविधीला 10 दिवस उलटले असून अद्याप त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. अजित पवार यांच्या निधनाला जवळपास 15 दिवस होत आले असून देशांतील विविध नद्यांमध्ये त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आलं. दरम्यान आज सुनेत्रा पवार या आज मोठ पाऊल उचलणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील त्या उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही सुनेत्रा पवार भेट देणार आहेत.
या मंत्रालयांची जबाबदारी
सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, तसेच अल्पसंख्याक या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पददेखील सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तसेच अजित पवार यांच्या वापरातील मंत्रालयातील दालने आणि शासकीय निवासस्थान सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज सकाळी पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही उपस्थित राहतील. त्यानंतर सुनेत्रा पवार या चैत्यभूमी या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करणार आहेत. त्यानंतर त्या विधानभवनात आमदारांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. तिथून मंत्रालयात पदभार स्वीकारून पहिल्या कॅबिनेट बैठकीलाही त्या उपस्थित राहणार आहेत.
