
आपल्या अभिनयाने मराठी-हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. तपोवनात साधुग्राम बांधण्याची योजना आहे. त्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. ही झाडं तोडण्याला नाशिकसह राज्यभरातील पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे. आज सयाजी शिंदे यांनी तपोवनात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तिथे उपस्थितांशी संवाद साधला. तपोवनातील झाडं तोडण्याच्या सरकारच्या भूमिकेवर त्यांनी जोरदार टीका केली.
“नाशिककरांनी जो तपोवन वाचवण्यासाठी लढा उभा केलाय. झाडं वाचवण्यासाठी मनस्थिती दाखवली आहे, त्या सगळ्या लोकांच्या बाजूने मी आहे. माझा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्र सह्याद्री देवराई त्यांच्या सगळ्यांच्यावतीने तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. तपोवन वाचवा नाशिका वाचवा” असं सयाजी शिंदे म्हणाले.
शासन आपल आहे की इंग्रजांच राज्य आहे?
“साधू आले, गेले त्याचा मला काही अभ्यास नाही. झाडं गेली तर नाशिककरांच मोठं नकुसान आहे. त्यामुळे मी झाडांच्या बाजूने आहे. इथलं एकही झाडं तुटता कामा नये, मी जो काय अभ्यास केलाय त्यानुसार इथलं एकही झाड तुटता कामा नये. आपल्याच माणसाने आपल्याला फसवलं तर त्यांना आपलं कसं म्हणायचं? शासन आपल आहे की इंग्रजांच राज्य आहे?” असा सवाल सयाजी शिंदे यांनी केला.
वडाचं झाड महत्वाचं आहे
“झुडुपांची, झाडांची व्याख्याच अूजन माहिती नाही. हे व्याख्या करणं अजून महाराष्ट्र सरकारला जमलेलं नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे. आपल्या देशात भारत सरकारनेच तो जास्त तोडलाय. त्याचं हे दुर्देव आहे. ही सगळी झाडं जास्त ऑक्सिजन देतात. वडाचं झाड महत्वाचं आहे. 500 ते 600 प्रकराच्या प्रजती त्यावर जगतात” असं सयाजी शिंदे म्हणाले.
गिरीश महाजन तुमची-माझी काही दुश्मनी नाही
“महाराष्ट्रात कुठेही झाड तुटू देऊ नका. झाडं म्हणजे आई-बाप. आमच्या आई-बापावर कोणी हल्ला केला, तर आम्ही गप्प बसणार का?” असा सवाल त्यांनी विचारला. “गिरीश महाजन उत्तर द्या. गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. तुमची-माझी काही दुश्मनी नाही आणि झालीच तरी काही फरक पडत नाही” असं सयाजी शिंदे म्हणाले.