दुनियेला हसवलं, पण ते दु:ख आजही छळतंय… अशोक सराफ यांना ती सल सांगताना अश्रू अनावर, पहिल्यांदाच…

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत आपल्या मनातील दु:ख व्यक्त केले. आपले आईवडील, विशेषतः वडील, त्यांची आजची अफाट लोकप्रियता आणि यश पाहण्यासाठी हयात नाहीत, याची त्यांना मोठी खंत आहे. त्यांच्या साधेपणामुळे त्यांनी कधी कौतुक केले नाही, पण मुलाच्या यशाचे समाधान त्यांना दिसावे अशी अशोक मामांची इच्छा होती. हे दु:ख सांगताना ते भावूक झाले.

दुनियेला हसवलं, पण ते दु:ख आजही छळतंय... अशोक सराफ यांना ती सल सांगताना अश्रू अनावर, पहिल्यांदाच...
Ashok Saraf
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 12:00 AM

अभिनेते अशोक सराफ यांचं नाव घेताच त्यांचा अभिनय, विनोद आणि अचूक टायमिंग डोळ्यासमोर येतो. त्यांच्या सिनेमातील वेगवेगळ्या भूमिका डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात. त्यांच्या विनोदी भूमिका आठवताच माणूस खळखळून हसू लागतो. पण दुनियेला हसवणाऱ्या या महान कलावंताच्या मनात एक दु:ख दाटलेलं आहे. ते दु:ख क्वचितच कुणाला माहीत असेल. पण ते दु:ख अशोक सराफ यांना सतत छळत असतं. आजही आठवण काढली तर त्यांना गहिवरून येतं. एका डीजिटल प्लॅटफॉर्मला अशोक सराफ यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी मनातील हे दु:ख बोलून दाखवलं. ते सांगताना त्यांचा कंठ दाटला. डोळ्यात अश्रू तरळले. हे पहिल्यांदाच घडत होतं. रिअल लाइफमध्ये अशोक मामा रडताना दिसले. अनेकांच्या मनात कालवाकालव झाली.

चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ यांनी एका डीजिटल प्लॅटफॉर्मला मुलाखत दिली. ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी आईवडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. खासकरून वडिलांबद्दल ते भरभरून बोलले. हे बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. कंठ दाटून गेला. माझे आईवडील खूप साधे होते. इतके साधे की त्यांनी माझे सिनेमे पाहिल्यावर कधी गाजावाजा केला नाही. ये काय रे बाळा असं कधी म्हटले नाही. त्यांच्या मौनातूनच त्यांना माझं काम आवडल्याचं समजून यायचं. त्यांनी कधीच माझं जास्ती कौतुक केलं नाही. किंवा त्यांनी मला कधी हे काम नको, असंही म्हटलं नाही. माझा मुलगा अमूक झालाय, तमुक झालाय, असं जाहीरपणे कधी प्रदर्शन केलं नाही, असं अशोक सराफ म्हणाले.

Loading...

ते आता नाहीत…

माझ्यासमोर माझं कौतुक केलं नाही. त्यामुळे लोकांच्यासमोर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी कुठेच बडेजाव दाखवला नाही. अशोक माझा मुलगा आहे, असं चारचौघांना सांगत सुटले नाहीत. उलट लोक म्हणायचे, हा एल. के. सराफ यांचा मुलगा. पण ते कधीच म्हणायचे नाही. मला एकाच गोष्टीची सल आहे, ती म्हणजे ते आता नाहीत, असं सांगताना अशोक मामा भावविवश झाले.

ते मला पाहिजे होतं…

पहिल्यांदा माझे वडील नाखूश होते. त्यांना सिनेमातील शाश्वती बाबत खात्री नव्हती. त्यामुळे मी त्या क्षेत्रात जाण्याबद्दल ते नाखूश होते. पण जेव्हा ही स्टेज येते, एवढी लोकप्रियता मिळते. यश येतं. नेमकं तेच बघायला ते नाहीयेत. हे मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या डोळ्यातील माझा आनंद, माझ्याबद्दलचं आनंदाचं कौतुक असेल, चार लोकांनी त्यांच्याकडे बोट दाखवून… कारण असं असतं की, जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात येता तेव्हा तुम्ही अमूकचे मुलगा म्हणून ओळखले जाता. नंतर प्रसिद्धी मिळाली, तुम्ही नावारुपाला आला तर परिस्थिती बदलते. मग याचे हे वडील असं म्हटलं जातं. ते मला पाहिजे होतं. नाही झालं. मोठी सल आहे. माझ्या दृष्टीने म्हणजे थोडीशी राहून गेलेली ही गोष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us