Laxmikant Berde : सचिन, तू माझ्यासाठी थांबू नकोस… लक्ष्याला लागली होती मृत्यूची चाहूल? शेवटच्या क्षणी काय घडलं?
उत्तम अभिनेते आणि दयाळू स्वभाव असलेले दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्याशी सख्ख्या भावांसारखे घट्ट नाते होते. सचिन पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटात लक्ष्या 'बाबू कालिया' ही खलनायकाची भूमिका साकारणार होते...

अचूक टायमिंग आणि हजरबाबीपणा तसेच संवेदनशील अभिनयावरही पकड असलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी वयाच्या मानाने खूप आधी जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीचंही आतोनात नुकसान झालं. मराठी इंडस्ट्रीत तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी आजही जागवल्या जातात. अभिनेता म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे महान होतेच. पण माणूस म्हणूनही ते तितकेच ग्रेट होते. मित्रांना मदत करण्यासाठी ते सर्वात आधी पुढे असायचे. दिग्दर्शक आणि निर्मात्यांना जसे हात द्यायचे, तसेच ते स्पॉटबॉयलाही मदतीचा हात देण्यासाठी सदैव पुढे असायचे. त्यामुळेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी आजही जागवल्या जातात.
मराठी सिनेसृष्टीत सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे या दोन्ही निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी एक काळ अधिराज्य गाजवलं. या दोघांचेही आवडते नट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. दोघांच्या सिनेमे या दोघांशिवाय पूर्ण व्हायचेच नाही. आणि लक्ष्या असो की अशोक मामा या दोन्ही निर्मात्यांसाठी हिंदी चित्रपट सोडायलाही तयार असायचे. एवढं त्यांचं बाँडिंग होते. हे चारही कलाकार केवळ कलाकार किंवा व्यावसायिक हितसंबंध असलेले कलाकार नव्हते. तर चौघेही एकमेकांचे सच्चे मित्र होते. त्यामुळेच चौघेही एकमेकांना सोडून काहीच करत नसायचे. एकमेकांना ते भाऊ मानायचे. त्यामुळे आजही सचिन असो, अशोक मामा असो किंवा महेश कोठारे… हे तिघेही जेव्हा लक्ष्याचा विषय काढतात तेव्हा हळवे होतात. काही तरी हरवल्याचा त्यांना भास होतो. त्यांचे डोळे पाणावतात.
तो बाबू कालिया होणार होता…
सचिन पिळगावकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमाचा एक किस्सा सांगितला होता. हा सिनेमा बनत होता तेव्हा लक्ष्या रुग्णालयात अॅडमिट होता. लक्ष्याचा हा शेवटचा काळ होता. प्रकृती गंभीर होती. सचिन या सिनेमात लक्ष्याला घेणार होते. लक्ष्या नवरा माझा नवसाचामध्ये बाबू कालियाचा रोल करणार होते. म्हणजे लक्ष्या चक्क खलनायक साकारणार होता.
अचानक त्याचे डोळे चमकले
लक्ष्या रुग्णालयात होता तेव्हा माझ्या सिनेमाचं काम थांबलं होतं. शिवाय लक्ष्याकडे नवीन सिनेमाही नव्हता. मी त्याला रुग्णालयात जाऊन भेटलो. तुझ्यासाठी थांबतो. तू बरा हो. नंतर आपण सिनेमा करू, असं मी लक्ष्याला सांगितलं, असं सचिन म्हणाले. मी लक्ष्याला हे सांगितल्यावर त्याचे डोळे चमकले. तो भारावला. तो मला म्हणाला, सचिन, तू माझ्यासाठी थांबू नकोस. तू सिनेमा बनव. मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं. मला पूर्वीसारखी मेहनत करायला डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्याचं म्हणणं ऐकल्यावर मी दुसऱ्या अभिनेत्याला घेतलं. पण या सिनेमात लक्ष्या असता तर ही भूमिका अधिक उंचीवर गेली असती. अधिक गाजली असती, असं सचिन म्हणाले. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा लक्ष्या जग सोडून गेलेला होता, असंही त्यांनी सांगितलं.