
Nilu Phule: ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘हमाल दे धमाल’, ‘एक होता विदूषक’ अशा अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही त्यांच्या भूमिका आणि त्यांचे डायलॉग चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अनेक सिनेमांमध्ये निळू फुले यांनी खलनायकाची भूमिका साकारली, पण त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.
निळू फुले आज अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत, पण त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. निळू फुले यांनी आयुष्यात मोठा खस्ता खाल्ला… लहानपणी त्यांनी हलाखीचे दिवस पाहिले. स्वतःच्या परिस्थितीबद्दल खुद्द निळू फुले यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.
रुपेरी पडद्यावर निळू फुले यांचा रुबाब दिसत असला तरी, त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जिथे त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. मुलाखतीत निळू फुले यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या होत्या. ‘आमच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. ‘
‘आमच्या लहानपणी मंडईमध्ये आमची दोन – चार दुकानं होती. पण काही काळानंतर ती देखील राहिली नाहीत. घरात बसलेल्या प्रत्येकाला नोकरी करावी लागत होती.’ यापुढे निळू फुले यांनी भावूक गोष्ट सांगितली, ‘माझी आई तर, चक्क मोलकरणीचं काम करायची…’
‘पुण्यामध्ये एक मशिनच्या वसतिगृहात तिने धुण्या – भांड्याचं आणि स्वयंपाकिणीचं काम केलं होतं… आम्ही दारिद्र खूप जवळून पाहिलं आहे..’ असं देखील निळू फुले म्हणाले होते. निळू फुले यांच्या आजही अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. त्यांची मुलीचं देखील मराठी सिनेविश्वातील मोठं नाव आहे. निळू फुले यांचं निधन 13 जुलै 2009 मध्ये वयाच्या 79 व्या वर्षी झालं.
दरम्यान, निळू फुले यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’, ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘गाव तसा चांगला पण वेशीला टांगला’, ‘माझा पती करोडपती’, ‘आई’, ‘हमाल दे धमाल’, ‘सोंगाड्या’, ‘भुजंग’, ‘फटाकडी’, ‘कशाला उद्याची बात’, ‘मोसंबी नारंगी’, ‘भिंगरी’, ‘शापित’, ‘पटली रे पटली’, ‘थापाड्या’, ‘कडकलक्ष्मी’, ‘एक होता विदूषक’, ‘धरपकड’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.