प्रसिद्ध मराठी रील स्टार प्रथमेश कदमचं निधन; मायलेकाची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय
Prathamesh Kadam: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. प्रथमेश आणि त्याच्या आईची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. आता त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही दु:खद बातमी सर्वांना सांगितली आहे. प्रथमेशच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना, फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांचे रील्स तुफान व्हायरल व्हायचे. मायलेकाची ही जोडी नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. सर्वसामान्यांसोबतच मराठी कलाकारांकडूनही त्यांच्या रील्सना विशेष पसंती मिळत होती. प्रथमेशच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं असून आजारपणामुळे त्याने प्राण गमावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
प्रथमेशचा जवळचा मित्र आणि सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरने त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश. देवाघरी स्वत:ची काळजी घे रे, खूप आठवण येईल तुझी, मिस यू भाई’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. तन्मयने प्रथमेशसोबतचा एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. तन्मयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
वडिलांच्या निधनानंतर प्रथमेशने त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. त्याने आईलाही धीर दिला होता. आईसोबत मिळून तो सोशल मीडियावर रील पोस्ट करू लागला होता आणि त्याला नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत होता. मायलेकाची जोडी सोशल मीडियावर पसंतीस उतरली होती. आधी पती आणि आता पोटच्या मुलाचं निधन झाल्यामुळे प्रथमेशच्या आईवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
View this post on Instagram
डिसेंबर 2025 मध्ये प्रथमेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने त्याची फसवणूक झाल्याचा खुलासा केला होता. त्याचसोबत तो त्याच्या आजारपणाबद्दलही व्यक्त झाला होता. आजारपणातही रुग्णालयातून त्याने मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत लोकांचं मनोरंजन केलं होतं. नवीन वर्षात त्याचं नवीन गाणंसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. तोच त्याचा अखेरचा व्हिडीओ ठरला आहे. प्रथमेशच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अजूनही विश्वास बसत नसल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
