T20 World Cup: दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज..; राहुल द्रविडसाठी मराठी लेखकाची खास पोस्ट

टी-20 वर्ल्ड कप आपल्या नावे केल्यानंतर देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांचीही कारकिर्द संपुष्टात आली.

T20 World Cup: दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज..; राहुल द्रविडसाठी मराठी लेखकाची खास पोस्ट
Rahul Dravid
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2024 | 10:36 AM

बार्बाडोसमध्ये शनिवारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टीम इंडियाने टी-20 प्रकारातील दुसरं जगज्जेतेपद पटकावलं. रोहित शर्माचं नेतृत्व, जसप्रीत बुमराची भेदक गोलंदाजी, हार्दिक पांड्या – सूर्यकुमार यादव – अक्षर पटेल – अर्शदीपसारख्या गुणी क्रिकेटपटूंचं योगदान, विराट कोहलीची मोक्याच्या क्षणी केलेली खेळी.. या सर्व घटकांमुळे हा विजय मिळवणं शक्य झालं. भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांना यापेक्षा मोलाची निरोपाची भेट मिळणार नव्हती. गेल्या वर्षभरात कसोटी विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठून भारताला विजयाने हुलकावणी दिली. पण अखेरीस तिसऱ्यांदा ट्वेंटी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात त्या कटू आठवणींची जळमटे साफ करून टीम इंडियाने जगभरातील लक्षावधी भारतीय क्रिकेटप्रेमींना जल्लोषाची संधी दिली. या विजयानंतर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्यासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांना अश्रू अनावर झाले. सध्या देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींनीही खास पोस्ट लिहिल्या आहेत. अशातच मराठी लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने राहुल द्रविड यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे.

क्षितीज पटवर्धनची पोस्ट-

‘व्यथेची दंतकथा व्हायला सर्वस्व द्यावं लागतं. राहुल द्रविड. काळाच्या परीक्षा संपल्या, पण माणसाचा अभ्यास नाही संपला. संधी बघता बघता सुटल्या पण माणसाची चिकाटी नाही सुटली. भूमिका वेळोवेळी बदलल्या पण माणसाची निष्ठा नाही बदलली. दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज शिखर म्हणून निवृत्त झाला. राहुल द्रविड. आदर्शांच्या छोट्याश्या यादीत तुझं नाव कायम वर असेल. कायम,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांसोबतच टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांचीही कारकीर्द संपली. द्रविड यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाला दोन वेळा आयसीसी फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता हा वर्ल्ड कप जिंकून संघाने त्यांना अविस्मरणीय निरोप दिला.