Mardaani 3 : विलेन 4 पटीने दमदार..; राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 3’वर प्रतिक्रियांचा वर्षाव

राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला क्राइम थ्रिलर 'मर्दानी 3' हा चित्रपट 30 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. राणीसोबतच यामध्ये अम्माची भूमिका साकारलेल्या मल्लिका प्रसादचंही कौतुक होतंय.

Mardaani 3 : विलेन 4 पटीने दमदार..; राणी मुखर्जीच्या मर्दानी 3वर प्रतिक्रियांचा वर्षाव
राणी मुखर्जी, मल्लिका प्रसाद
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 01, 2026 | 10:59 AM

अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला क्राइम थ्रिलर ‘मर्दानी 3’ हा चित्रपट 30 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या रिव्ह्यूजवरून हा चित्रपट दमदार आणि थिएटरमध्ये बघण्यालायक असेल, असं दिसतंय. याची कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर आपापली मतं मांडली आहेत. फेसबुक, ट्विटरवर राणी मुखर्जीच्या या चित्रपटाचे रिव्ह्यू व्हायरल होत आहेत. या चित्रपटात राणी महिला पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत आहे. ‘मर्दानी’ फ्रँचाइजीमधील तिचा हा तिसरा चित्रपट आहे. यामध्येही तिने तडफदार पोलीस अधिकारीची भूमिका साकारली आहे.

मर्दानी 3 ची कथा मनाला भिडणारी आहे. यामध्ये राणी मुखर्जीने अत्यंत पॉवरफुल आणि निडर व्यक्तिमत्त्व असलेल्या पोलीस अधिकारीची भूमिका साकारली आहे. जबरदस्त अॅक्शन सीन्स, मध्यांतरानंतरची दमदार कथा आणि मजबूत क्लायमॅक्स. पैसा वसूल असा चित्रपट असेल’, असं एकाने लिहिलंय. तर ‘या चित्रपटाची कथा दमदार आहे. गुन्हा आणि न्याय या विषयावर ही कथा टिकून राहते. या चित्रपटाचा शेवट तुमचं लक्ष वेधून घेतो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. राणी मुखर्जीसोबतच या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या मल्लिका प्रसादचीही प्रशंसा होतेय.

राष्ट्रीय तपास यंत्रणेतील शिवानी रॉयवर दोन मुलींच्या अपहरणाशी संबंधित एका प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी सोपविण्यात येते. जसजशी शिवानी या प्रकरणाचा खोलवर तपास करते, तसतसे त्यात भयानक वळण येतात. यातूनच मुलींची तस्करी करणाऱ्या ‘अम्मा’शी (मल्लिका प्रसाद) शिवानीचा सामना होतो. जे प्रकरण सुरुवातीला तस्करीपुरतं मर्यादित वाटतं, ते नंतर एका मोठ्या माफियाशी जोडलं जातं. ‘मर्दानी 3’मध्ये ‘शैतान’ फेम जानकी बोडीवालासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

‘मर्दानी’ या चित्रपटाची कथा आणि कल्पना ही दिल्लीतल्या निर्भया घटनेनंतर आकाराला आली होती. निर्भया प्रकरणानंतर लोकांच्या मनात प्रचंड राग होता. स्त्रियांवर होणारा अन्याय, शोषण याची गोष्ट चित्रपटातून समाजासमोर यावी, असा त्यामागे उद्देश होता. ‘मर्दानी’च्या तिन्ही भागांचे विषय हे वास्तवावर आधारित आहेत. ‘मर्दानी’ या पहिल्या चित्रपटापासून ते आताच्या तिसऱ्या सीक्वेलपर्यंत सगळे विषय हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आधारित आहेत. पहिल्या चित्रपटात मुलींना पळवून नेऊन मानवी तस्करी करणाऱ्यांवर प्रकाश टाकण्यात आला होता. दुसऱ्या चित्रपटात महिलांवर बलात्कार करून त्यांना ठर मारणाऱ्या विकृत माणसाची कथा होती आणि आता तिसऱ्या चित्रपटातही मुलींचं अपहरण करून त्यांचं शोषण करणाऱ्यांचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.