तीन आमदारांना संपवण्याचा घाट, संजय राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया
तीन आमदारांना संपवण्याचा घाट होता, असा आरोप संजय राऊतांनी केला. संजय राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी राजकीय वर्तुळ हादरवणारा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना फुटीच्या काळात तीन आमदारांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा आरोप संजय राऊतांनी केला. खरंतर सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं, असं विधान संजय शिरसाट यांनी केल्याने चर्चेला सुरुवात झाली होती. त्यानंतर राऊतांनी प्रतिक्रिया देत तीन आमदारांना ठार मारण्याचा कट रचला गेला होता, असा दावा केला. या आरोपावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊतांच्या आरोपावर शिंदे गटाचे, मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या दृष्टीकोनातून विषय संपल्याचे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाचे नेते, मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय शिरसाट म्हणाले, ‘ती जुनी बातमी झाली. तो विषय संपला आहे. 2022 सालची घटना आहे. तो प्रकार संपला. त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करण्यात अर्थ नाही. संजय राऊतांना 10-5 किलोमीटर पुढचं दिसत असतं. त्यामुळे त्यात वाद घालणे, योग्य नाही. तो विषय आमच्या दृष्टीकोनातून संपला आहे’.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चेवर शिरसाट म्हणाले, ‘ शरद पवार निवृत्त होतील असं वाटत नाही. त्यांनी शेवटपर्यंत राजकारणात शेअर राहावं,अशी आमची इच्छा आहे’. राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडीवर म्हणाले, राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे, यावर भाष्य करणं उचित नाही. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पक्षात अनेकांचे वेगवेगळे मत असतात. त्यामुळे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, ते योग्य घेतील’. गोकुळच्या शासननियुक्त संचालक प्रकरणात कोर्टात बाजू मांडण्यासाठी सरकारने 80 लाख खर्च केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. त्यावर शिरसाट म्हणाले, गोकुळच्या शासननियुक्ती संचालकांची बाजू कोर्टात मांडण्यायसाठी सरकारने कोर्टात 80 लाख खर्च केल्याचा आरोप आहे. त्यावर संजय शिरसाट म्हणाले, त्याच्याविषयी परिपूर्ण माहिती आम्हाला माहिती नाही. वकिलांची फी किती आहे, किती रुपये दिली, याविषयी अधिकृत माहिती नाही’. संदिप देशपांडेंच्या 50 लाखांच्या व्हिडिओ बॉम्बवर देखील त्यांनी भाष्य केलं. ‘आजकाल एआयच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ येतात. त्यातील सत्यता पडताळून पाहावी लागेल’.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहावर शिरसाट म्हणाले, ‘रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात भांडण असण्याचं कारण नाही. तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. परंतु तो त्यांचा पक्षातील अंतर्गत विषय आहे. पवार कुटंब आहे. त्यांच्यात काय झालं, हे माहिती नाही. योग्यवेळी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे सांगतील. त्याच्यावर आम्ही वेगळंच विधान करणे, योग्य नाही’. तसेच एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना वादग्रस्त विधाने करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यावर शिरसाट म्हणाले, ‘ते पक्षाचे प्रमुख आहेत. कमी बोलून जास्त काम करणे हा शिंदे साहेबांचा स्वभाव आहे. त्यांनी अंमलबजावणीचे आदेश दिले. आम्ही त्याचं पालन करणार आहोत’.
