आई शप्पथ! ये कुत्रे साले..; 3 मिनिट 16 सेकंदांचा ‘मर्दानी 3’चा ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा!
राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 3' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. शिवानी रॉयच्या भूमिकेत राणी परतली असून यावेळी तिची झुंज अम्माशी होणार आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मर्दानी 3’ या चित्रपटाचा ट्रेलर यशराज फिल्म्सकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. मर्दानीच्या या आधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता शिवानी रॉय या पोलीस अधिकारीच्या भूमिकेत राणी मुखर्जी पुन्हा मोठ्या पडद्यावर परतली आहे. 3 मिनिट 16 सेकंदांचा हा ट्रेलर पूर्णपणे खिळवून ठेवणारा आहे. यामध्ये राणीचा अत्यंत निर्भीड अंदाज पहायला मिळतो. देशातील बेपत्ता झालेल्या असंख्य मुलींना वाचवण्यासाठी तिने मोहीम हाती घेतली आहे. यावेळी शिवानीचा सामना एका निर्दयी, दुष्ट आणि क्रूर स्त्री ‘अम्मा’शी होमार आहे. निष्पाप जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवानी अत्यंत हिंसक लढाई लढणार आहे.
या ट्रेलरची सुरुवातच दोन लहान मुलींच्या अपहरणाने होते. त्यानंतर NIA शिवानी रॉय यांच्याकडे ही केस सोपवली जाते. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाची कथा असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 3 महिन्यात 93 मुली गायब झाल्याचं जेव्हा शिवानीला समजतं, तेव्हा ती कसून तपास सुरू करते. त्यातच तिला एका आरोपीकडून कुसूमपूरच्या अम्माबद्दल समजतं. आठ-नऊ वर्षांच्या गरीब घरातील मुलींचं अपहरण करून अम्मा त्यांचं काय करते, याचा छडा शिवानीला लावायचा आहे. यात अम्मा आणि शिवानी रॉय यांच्यातील फोनवरील संवादसुद्धा जबरदस्त आहे. एकंदरीत राणी मुखर्जीच्या चित्रपटाविषयी या ट्रेलरने चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे.
पहा ट्रेलर
ट्रेलरमध्ये ‘अम्मा’च्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रीचं नाव मल्लिका प्रसाद असून ‘शैतान’ फेम जानकी बोडीवालासुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. ‘मर्दानी 3’चं लेखन ‘द रेल्वे मॅन’ फेम आयुष गुप्ता यांनी केलं असून त्यांचा हा चित्रपट जागतिक स्तरावर यशस्वी ठरला होता. अभिराज मिनावाला दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्राने केली आहे. ‘मर्दानी’ फ्रँचाइजीमधील पहिल्या चित्रपटात मानवी तस्करीचं भीषण वास्तव उघड करण्यात आलं होतं. तर ‘मर्दानी 2’मध्ये व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका सराईत बलात्काऱ्याच्या अस्वस्थ करणाऱ्या मानसिकतेचं चित्रण करण्यात आलं होतं. आता ‘मर्दानी 3’मधून समाजातील आणखी एक गडद आणि क्रूर वास्तव दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट येत्या 30 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
