Vidyanand Bapat : सामाजिक व्यंगावर बोट ठेवत…रंगभूमीवर ‘बापट’चीच चर्चा; ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका, काय म्हणाला?
Vidyanand Bapat : सध्या रंगभूमीवरही बापटांची चर्चा सुरू असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट गणेशोत्सवादरम्यान चर्चेत आले होते. त्यांनी डीजेबंदी करण्याची मागणी केलेली. त्यांची केलेली अनेक वक्तव्यही चर्चेत आली होती. सध्या विद्यानंद बापट कुठे दिसत नाहीयेत. मात्र, आता विद्यानंद एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. अशातच रंगभूमीवर ‘गेला बापट कुणीकडे‘ या नाटकाची चर्चा सुरू आहे.
काही दशकांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दादामलेंनी ‘गेला माधव कुणीकडे’ असं विचारत नाट्यरसिकांना खळखळून हसवलेलं. याच धर्तीवर लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे ‘गेला बापट कुणीकडे’ या नव्या नाटकातून प्रेक्षकांना कोड्यात टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. या नाटकात ‘बापट’ची भूमिका अभिनेता मिलिंद फाटक साकारणार आहेत. या नाटकाच्या निमित्तानं मिलिंद चार वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहे.
नाटकाबद्दल काय म्हणाले मिलिंद फाटक?
नाटकाविषयी बोलताना मिलिंद म्हणाले की, ‘राजेश देशपांडेकडून मला नाटकासाठी विचारणा झाली. नाटक वाचल्यावर मी लगेच होकार दिला. हे नाटक म्हणजे उत्तम फार्स आहे. सध्या रंगभूमीवर ‘फार्स’ हा प्रकार फारसा दिसत नाही. त्यामुळे फार्स पाहण्यासाठी हे नाटक एक उत्तम पर्याय आहे.’
View this post on Instagram
‘नाटकातली बापटची भूमिका मला फार भन्नाट वाटली. म्हणून मी नाटक वाचून लगेच होकार दिला. या नाटकाला सामाजिक संदर्भ असला, तरी हे नाटक गंभीर धाटणीचं अजिबात नाही. सामाजिक व्यंगावर बोट ठेवत, प्रेक्षकांना हसवत हळूच चिमटे काढले जातील. हा एक पूर्णतः विनोदी फार्स आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा फार्स करतोय. त्यामुळं मला फार धमाल येतेय.’ असंही मिलिंद यांनी सांगितलं. ‘मुंबई टाइम्स‘ला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद फाटक यांनी सांगितलं.
दरम्यान, या नाटकामध्ये मिलिंद यांच्यासह पौर्णिमा तळवळकर, राजेश चिटणीस, परी तेलंग, पालवी कदम, चिंतन लांबे, राम राणे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. या नाटकाचं लेखन दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं असून नाटकाची निर्मिती हार्दिक मोगावीरा आणि सह–निर्मिती राम राणे यांची आहे.
