मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; ‘एक मित्र म्हणून त्याच्या..’
प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाच्या यशानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. मुरलीधर हे प्रवीण तरडे यांना लहानपणापासून ओळखतात आणि त्यांनी त्याचा संघर्षही पाहिला आहे.

प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे सोशल मीडियावर याचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे चित्रपटाच्या या यशानिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे फोटो शेअर करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे. मुरलीधर मोहोळ आणि प्रवीण तरडे हे बालपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. त्यामुळे मित्राचं हे यश पाहून खूप अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येत प्रवीण तरडेंनी कशा पद्धतीने चित्रपटसृष्टीत नाव कमावलंय, याविषयी त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट-
‘गोष्ट मोठी, 100 कोटी; अभिमान.. मित्राच्या यशाचा. बालपणापासूनचा माझा जिवलग मित्र, आणि आज मराठी चित्रपटसृष्टीतील सलग सहा सुपरहिट चित्रपट देणारा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे याच्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने अवघ्या 50 दिवसांत 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या दैदीप्यमान यशानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होतान मन अतिशय आनंदाने आणि अभिमानाने भरून आलं. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारजी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती,’ असं त्यांनी लिहिलं आहे.
पहा फोटो-
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘बालपणापासून आजपर्यंत आम्ही एकमेकांचा प्रवास जवळून पाहिला आहे. संघर्ष, कष्ट, स्वप्नं आणि त्यासाठी घेतलेली अथक मेहनत.. या प्रत्येक टप्प्याचे आम्ही साक्षीदार आहोत. कोणतीही सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसताना, एका सामान्य शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रवीणने आपल्या जिद्द, प्रतिभा आणि अविरत परिश्रमांच्या जोरावर मिळवलेलं हे यश केवळ त्याचं वैयक्तिक यश नाही, तर असंख्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. एक मित्र म्हणून त्याच्या या यशाचा मनापासून अभिमान वाटतो. ‘देऊळ बंद 2’च्या या ऐतिहासिक यशासाठी प्रवीण आणि संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन! मराठी चित्रपटसृष्टीला अशीच नवनवी शिखरं गाठत राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.’
‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये स्नेहल तरडे, मोहन जोशी, प्रवीण तरडे, प्रसाद ओक यांच्या भूमिका आहेत.