याच हवेत आपली मुलं..; फटाके फोडणाऱ्यांवर भडकली शाहिद कपूरची पत्नी, फोटोसाठी हातात सुरसुरी घेणाऱ्यांनाही झापलं

दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांवर अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत चांगलीच भडकली आहे. याच हवेत आपली मुलं श्वास घेतायत, असं म्हणत तिने विनंती केली आहे. त्याचसोबत फक्त फोटोसाठी हातात सुरसुरी घेणाऱ्यांनाही तिने झापलंय.

याच हवेत आपली मुलं..; फटाके फोडणाऱ्यांवर भडकली शाहिद कपूरची पत्नी, फोटोसाठी हातात सुरसुरी घेणाऱ्यांनाही झापलं
Mira Rajput
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2025 | 12:25 PM

दिवाळीनिमित्त नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. मुंबईतील हवा बिघडली असून, मंगळवारी हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदवली गेली. मुंबईच्या हवेचा निर्देशांक 211 इतका होता. मुंबई शहरासह उपनगरांमध्येही वातावरणावर फटाक्यांचा परिणाम झाला. यावरून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आवाज उठवला आहे. अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. परंपरा किंवा लहान मुलांसाठी मजेच्या नावाखाली याला सर्वसामान्य म्हणणं थांबवा, अशी विनंती तिने केली आहे. मुंबईसह दिल्लीतल्या हवेचीही गुणवत्ता खालावली आहे.

मंगळवारी मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘आपण अजूनही फटाके का फोडत आहोत? जरी ते फक्त मुलांना एकदा पाहण्यासाठी किंवा आपण ते फक्त त्यांना अनुभवण्यासाठी एकदा फोडत असलो तरी ते योग्य नाही. फक्त इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करण्यासाठी हातात ‘सुरसरी’ घेणंही बरोबर नाही. कृपया या सर्व गोष्टी सर्वसामान्य आहेत, असं म्हणणं थांबवा. आपण या गोष्टींना सर्वसामान्य ठरवलं तर आपली मुलंही तेच करतील आणि या गोष्टींना अंतच नसेल. ‘पृथ्वी दिना’निमित्त तुम्ही तुमच्या मुलांकडून ‘फटाक्यांना नाही म्हणा’ असे पोस्टर बनवून घेता आणि पुन्हा दिवाळी आली की तीच गोष्ट विसरता. AQI ची बातमी ही काही इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकण्यासाठी नाही. याच हवेत आपली मुलं श्वास घेत आहेत.’

‘अशा परंपरेत मला सहभागी व्हायची इच्छा नाही आणि दु:खद बाब म्हणजे विशेषाधिकार, शिक्षण, जागरुकता आणि समृद्धी असूनही सामान्य ज्ञानाचा अभाव आहे. त्यामुळे तुम्ही फटाक्यांचा आनंद घेत असताना मी माझ्या मुलांना ते पाहण्यासाठी पाठवणार नाही. कृपया थांबा’, अशी विनंती तिने या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

बुधवारी वांद्रे इथं धुराचे जाड थर आढळले, कारण हवेची गुणवत्ता 300 वर पोहोचली होती. तर दिल्लीमध्ये 345 एक्यूआयची नोंद झाली आहे. सीपीसीबीनुसार, ही श्रेणी ‘अत्यंत वाईट’ म्हणून वर्गीकृत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळनंतर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.