प्रसिद्ध टीव्ही होस्टसह 12 जणांना फाशीची शिक्षा; नेमकं काय आहे प्रकरण?
'मिशन इम्पॉसिबल' या प्रसिद्ध कार्यक्रमाची होस्ट सारा खलिफाबद्दल महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. न्यायालयाने सारासह एकूण 12 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या..

प्रसिद्ध टीव्ही होस्ट सारा खलिफा हिला ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीच्या गंभीर प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इजिप्तमधल्या कैरो इथल्या न्यायालयाने सारा खलिफासह एकूण 12 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, त्यासाठी लागणारा कच्चा माल, बेकायदेशीर शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सारा खलिफा ही इजिप्तमधील ओळखीची टीव्ही पर्सनॅलिटी असून ‘मिशन इम्पॉसिबल’ या कार्यक्रमामुळे ती प्रसिद्ध झाली. या कार्यक्रमात सुरक्षा आणि गुन्हेगारीशी संबंधित विषयांवर चर्चा केली जात असे. मात्र, आता स्वतः सारा खलिफाच एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अडकल्याने तिचं नाव चर्चेत आलं आहे.
750 किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त
न्यायालयातील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमली पदार्थ तयार करून त्यांची तस्करी करण्यासाठी एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. या टोळीचा संबंध सिंथेटिक ड्रग्जच्या निर्मितीशी असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 750 किलोहून अधिक ड्रग्ज आणि त्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल जप्त करण्यात आला. याशिवाय बेकायदेशीर शस्त्रं आणि दारूगोळाही सापडला. या प्रकरणातील तपासादरम्यान दोन अपार्टमेंट्सचा वापर ड्रग्ज तयार करण्यासाठी प्रयोगशाळा म्हणून केला जात असल्याचंही समोर आलं. परदेशातून आयात केलेल्या साहित्याच्या मदतीने सिंथेटिक ड्रग्ज तयार करून त्यांची विक्री आणि तस्करी केली जात असल्याचं इजिप्तमधील अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
टीव्ही कार्यक्रमामुळे प्रसिद्ध असलेल्या सारा खलिफाचा कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिक आणि पार्टी तसेच इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित प्रोडक्शन कंपनीशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय सारा खलिफा आणि इतर काही आरोपींना एका तरुणाचं अपहरण आणि त्याच्यावर हल्ला केल्याच्या स्वतंत्र प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
मृत्युदंडाच्या शिक्षेपूर्वी इजिप्तच्या कायद्यानुसार देशाच्या ग्रँड मुफ्तींचं मत घेण्यात आलं होतं. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याची संधी आरोपींना आहे. इजिप्तमध्ये अमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद आणि काही गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद आहे.
