Kapil Sharma : 30 वर्षे झाली तरी अजूनही..; मनसेचा कपिल शर्माला इशारा, ऐकलं नाही तर थेट सेटवर..

Kapil Sharma : मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कॉमेडियन कपिल शर्माला थेट इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी कपिलच्या टीमला पत्रसुद्धा लिहिलं आहे. वेळीच बदल केला नाही किंवा ऐकलं नाही तर सेटवर आंदोलन करणार आणि शूटिंग बंद पाडणार, असं ते म्हणाले.

Kapil Sharma : 30 वर्षे झाली तरी अजूनही..; मनसेचा कपिल शर्माला इशारा, ऐकलं नाही तर थेट सेटवर..
Kapil Sharma and Raj Thackeray
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2025 | 1:50 PM

Kapil Sharma : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा सध्या मनसेच्या रडारवर आला आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी त्याला थेट विनंतीवजा इशाराच दिला आहे. हा मुद्दा आहे मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणण्याचा. ‘बॉम्बे’चं मुंबई असं अधिकृत नामकरण होऊन तीस वर्षे उलटली तरी अजूनही कपिलच्या शोमध्ये सर्रासपणे बॉम्बे असा उल्लेख होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी कपिल शर्माच्या शोची एक क्लिप एक्स (ट्विटक) अकाऊंटवर शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींकडून आणि खुद्द कपिलकडूनही मुंबईऐवजी ‘बॉम्बे’ असा उल्लेख अनेकदा झाला आहे.

अमेय खोपकरांची पोस्ट-

‘बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन 30 वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूडमधील ‘कपिल शर्मा शो’ यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. 1995 महाराष्ट्र शासन आणि 1996 मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे,’ असं त्यांनी म्हटलंय. यावर आता कपिल किंवा त्याच्या टीमकडून त्या उत्तर देण्यात येईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याच मुद्द्यावरून ‘झी 24 तास’शी बोलताना अमेय खोपकर म्हणाले, “फक्त कपिल शर्माच्या शोमध्येच नाही तर हिंदी चित्रपट किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज असो.. जाणूनबुजून मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला जातोय. हेच चेन्नई किंवा बंगळुरू बोलायचं असतं तेव्हा नीट नावं घेतात. मनसेकडून कपिलच्या टीमला पत्र देण्यात आलं आहे. जर बदल झाला नाही तर सेटवर जाऊन मनसेकडून आंदोलन करण्यात येईल आणि शूटिंग बंद पाडलं जाईल. स्वत: कपिल गेल्या 15-17 वर्षांपासून मुंबईत राहतोय. तरी त्याला अजून शहराचं नाव नीट घेता येत नाही का? त्याला कपिलऐवजी टपिल असं म्हटलं तर चालेल का? आम्ही त्याच्या किंवा बॉलिवूडच्या विरोधात नाही, पण शहराचं नाव मुंबई असंच घेतलं पाहिजे.”