मनाला सुकून देणारं 56 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, Gen Z चं प्रचंड आवडतं, गाण्यावर बनलेत लाखो रील्स
मोहम्मद रफी यांचं 56 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे तुर्कीमध्ये केलं गेलं कॉपी. सध्या Gen Z चं प्रचंड आवडतं. बनलेत हजारो रील्स. ऐकताच मनाला मिळतो सुकून.

हिंदी सिनेसृष्टीतील काही गाणी काळाच्या ओघात अजरामर झाली आहेत. मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘गुलाबी आंखें जो तेरी देखीं…’. 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या द ट्रेन चित्रपटातील हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरते.
‘गुलाबी आंखें’ हे एक रोमँटिक आणि उत्साही गाणं आहे. मोहम्मद रफी यांच्या जादुई आवाजाला आर. डी. बर्मन यांच्या संगीताची आणि गीतकार आनंद बक्षी यांच्या शब्दांची साथ लाभली. राजेश खन्ना आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं.
विशेष म्हणजे आजच्या Gen Zमध्येही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. सोशल मीडियावर या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स तयार केल्या जातात. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही गाण्याची लोकप्रियता कायम असल्याचं यावरून दिसून येतं.
तुर्कीमध्येही पोहोचली गाण्याची धून
‘गुलाबी आंखें’ची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. तुर्की हिप-हॉप कलाकार डा पोएट यांनी 2008 मध्ये त्यांच्या Risk या अल्बममधील ‘Ayağa Kalk’ या ट्रॅकसाठी ‘गुलाबी आंखें’च्या धून आणि व्होकल्सचा वापर केला होता. त्यामुळे रफी यांच्या आवाजातील या गाण्याची धून आंतरराष्ट्रीय संगीतविश्वातही पोहोचली.
आर. डी. बर्मन यांच्या धूनला झाला होता विरोध
द ट्रेन हा रविकांत नागाइच दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट होता. हा चित्रपट 1967 मधील मल्याळम चित्रपट कोचीन एक्सप्रेसचा रिमेक होता. राजेश खन्ना यांनी सीआयडी इन्स्पेक्टर श्याम कुमार, तर नंदा यांनी नीता/गीता यांची भूमिका साकारली होती. हेलेन, मदन पुरी आणि राजेंद्रनाथ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
माहितीनुसार, आर. डी. बर्मन यांनी तयार केलेली ‘गुलाबी आंखें’ची सुरुवातीची धून दिग्दर्शकांना थ्रिलर चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर काहीशी संथ वाटली होती. त्यानंतर पंचम दांनी त्यात वेगवान बीट्स, गिटार आणि ड्रम्सचा वापर करून गाण्याला अधिक उत्साही अंदाज दिला.
‘द ट्रेन’ ठरला होता बॉक्स ऑफिसवर हिट
नंदा यांनीच निर्माते राजेंद्र कुमार यांच्याकडे राजेश खन्ना यांच्या नावाची शिफारस केल्याचं सांगितलं जातं. द ट्रेन बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि राजेश खन्ना यांच्या सलग हिट चित्रपटांच्या काळातील महत्त्वाचा चित्रपट ठरला.