Mohit Raina: घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर ‘महादेव’ फेम मोहीत रैनाने सोडलं मौन; म्हणाला..

'या' कारणामुळे पत्नीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही; घटस्फोटाच्या चर्चांवर मोहीतचं उत्तर

Mohit Raina: घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर महादेव फेम मोहीत रैनाने सोडलं मौन; म्हणाला..
Mohit Raina
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 21, 2022 | 8:18 AM

मुंबई: ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता मोहीत रैना याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. मोहीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पत्नीसोबतचे सर्व फोटो डिलिट केल्याने या चर्चा होऊ लागल्या होत्या. आता घटस्फोटाच्या चर्चांवर खुद्द मोहीतने स्पष्टीकरण दिलं आहे. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं त्याने म्हटलंय. याचसोबत तो इन्स्टाग्रामवर पत्नीला का फॉलो करत नाही, याचंही उत्तर मोहीतने दिलंय.

“या सर्व चर्चा तथ्यहीन आहेत. या चर्चांना कुठून सुरुवात होते, हेच मला कळत नाही. पण यात काहीच सत्य नाही. अदिती आणि मी, आमच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहोत. मला याबद्दल आणखी बोलायला आवडलं असतं, पण आम्ही सध्या हिमाचल प्रदेशनमध्ये लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतोय”, असं मोहीत म्हणाला.

मोहीत आणि अदिती एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीत आणि मोहीतनेही लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले, यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. याविषयी मोहीतने उत्तर दिलं, “लग्नाचे सर्व फोटो आमच्याकडे आहेत. आम्ही दोघं इन्स्टाग्रामवर एकमेकांना यासाठी फॉलो करत नाही, कारण अदिती या इंडस्ट्रीतली नाही. त्यामुळे तिला विनाकारण प्रकाशझोतात यायला आवडत नाही. आम्हाला आमचं खासगी आयुष्य असंच जपायचं आहे.”

मोहीतप्रमाणे अदिती ही कलाविश्वातील नाही. अदिती तंत्रज्ञानाशी संबंधित काही कामं करते. मोहीत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारसा व्यक्त होत नाही. या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली.

मोहीत रैना टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चांगलाच लोकप्रिय आहे. देवों के देव.. महादेव या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातही भूमिका साकारली. त्याचसोबत काफीर, भौकाल, मुंबई डायरीज 26/11 यांसारख्या वेब सीरिजमध्येही तो झळकला.