Jug Jugg Jeeyo Movie Review: अनिल कपूर यांची ‘झक्कास’ ॲक्टिंग; जुन्या कथेचीच नवी मांडणी

| Updated on: Jun 24, 2022 | 11:45 AM

या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा झाली. त्याचं प्रमोशनसुद्धा दणक्यात झालं. यामध्ये वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या भूमिका आहेत. राज मेहताने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

Jug Jugg Jeeyo Movie Review: अनिल कपूर यांची झक्कास ॲक्टिंग; जुन्या कथेचीच नवी मांडणी
Jug Jugg Jeeyo Movie
Image Credit source: Instagram
Follow us on

आपल्या समाजावर दिखाव्याची सर्वाधिक भुरळ पडते. मात्र जेव्हा खरी परिस्थिती सर्वांसमोर येते, तेव्हा मात्र निराशा होते. करण जोहरचा (Karan Johar) मल्टी स्टारर ‘जुग जुग जियो’ (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट पाहून हीच भावना मनात येते. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा झाली. त्याचं प्रमोशनसुद्धा दणक्यात झालं. मात्र चित्रपटाची कथा प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवण्यात अयशस्वी ठरते. यामध्ये वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या भूमिका आहेत. राज मेहताने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. (Movie Review)

कथा जुनीच मांडणी नवी

या चित्रपटाची सुरुवात कुकू (वरुण धवन) आणि नैना (कियारा अडवाणी) यांच्या लव्हस्टोरीने होते. लहानपणापासून दोघं एकमेकांना पसंत करतात आणि मोठे झाल्यावर लग्नाचा निर्णय घेतात. लग्नानंतर पाच वर्षांनी कथा पुढे सरकते. कुकू आणि नैना हे पटियालाहून कॅनाडाला पोहोचतात. मात्र आता त्यांच्या नात्यात प्रेम उरत नाही. सतत दोघं भांडण करत असतात. ही भांडणं इतकी टोकाला पोहोचतात की अखेर दोघं घटस्फोटाचा निर्णय घेतात. घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात, तेव्हाच कुकूची छोटी बहीण गिन्नीच्या लग्नाची बोलणी होते. बहिणीच्या लग्नासाठी कुकू आणि नैना भारतात येतात. याच संधीचा फायदा घेत दोघं आपल्या कुटुंबीयांना घटस्फोटाबद्दल सांगण्याचा निर्णय घेतात. मात्र इतक्यात त्यांनाच मोठा धक्का बसतो. कुकूचे वडील भीम (अनिल कपूर) आणि आई गीता (नीतू कपूर) हेच घटस्फोट घेणार असल्याचं त्याला कळतं. आता कुकू आपलं नातं वाचवणार की आपल्या आई-वडिलांचं किंवा कुकू-नैनासोबतच भीम-गीतासुद्धा विभक्त होणार का, हे प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. वरुण धवन, अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा अडवाणी आणि मनिष पॉल हे कलाकार प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडत नाही. चित्रपटातील संवाद आणि गाणी चांगली आहेत, मात्र कथा जुनीच आहे. लग्न आणि घटस्फोटाबाबत याआधीही अनेक चित्रपट बनले आहेत. धर्मा प्रॉडक्शनने आता फक्त हा मसालापट करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेले सेटसुद्धा आकर्षक आहेत, मात्र कथाच प्रेक्षकांची निराशा करते. चित्रपटाचा शेवट हा इतर अनेक चित्रपटांसारखा प्रेडिक्टेबल आहे. पुढे काय घडू शकतं, याची कल्पना प्रेक्षकांना आधीच येते. मध्यांतरानंतरची कथा आणखी रटाळवाणी वाटू लागते.

वरुण धवनपुढे अनिल कपूर, मनिष पॉलच्या अभिनयाची कमाल

वरुण धवनला आजवर प्रेक्षकांनी अधिकाधिक कॉमेडी भूमिकांमध्ये पाहिलंय. त्यामुळे त्याला गंभीर भूमिका तितक्या जमत नाही, असं वाटतं. ‘जुग जुग जियो’मध्ये अनिल कपूर यांच्या झक्कास कॉमेडीसमोर वरुण धवनची भूमिका फिकी पडते. इतकंच नव्हे तर मनिष पॉलची भूमिकासुद्धा वरुणपेक्षा चांगली वाटू लागते. कॉमेडीच्या बाबतीत त्याने वरुणला मागे टाकलंय. कियारा अडवाणी आणि नीतू कपूर यांनी त्यांच्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळीची यात छोटीच भूमिका आहे. मात्र त्यातही ती छाप सोडून जाते.

पहा व्हिडीओ

आजवर अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेली तीच-तीच कथा ‘जुग जुग जियो’मध्ये नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मोठ्या कलाकारांची नावं आणि चित्रपटाचं प्रमोशन याचा कमाईसाठी फायदा निश्चित होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर ‘पैसा वसूल’ची भावना मनात येत नाही.