टीव्हीच्या ‘विभीषण’चा दु:खद शेवट; 9 वर्षांपूर्वी रेल्वे रुळांवर संपलं आयुष्य

अभिनेते मुकेश रावल यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत विभीषण यांची भूमिका साकारली होती. परंतु त्यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घेऊयात..

टीव्हीच्या विभीषणचा दु:खद शेवट; 9 वर्षांपूर्वी रेल्वे रुळांवर संपलं आयुष्य
Mukesh Rawal
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2025 | 1:34 PM

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेला जवळपास 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. लॉकडाऊनमध्ये जेव्हा ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली, तेव्हासुद्धा प्रेक्षकांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. याच मालिकेत विभीषण यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. नंतर जेव्हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं, तेव्हा त्यावरून पडदा उचलण्यात आला होता.

लंकेश रावणचा भाऊ विभीषण यांची भूमिका साकारलेले अभिनेते मुकेश रावल खूप लोकप्रिय कलाकार होते. रामानंद सागर यांच्या या मालिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. विभीषण यांच्या भूमिकेला ते अक्षरश: जगले. त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं होतं. परंतु विभीषण यांच्या भूमिकेतून त्यांनी जी छाप सोडली, ती आजवर कायम आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मुकेश यांचं रंगभूमीवरील दमदार अभिनयकौशल्य पाहूनच त्यांना रामायणातील भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

काही रिपोर्ट्सनुसार, असंही म्हटलं जातं की मुकेश यांनी मेघनादच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. त्यावेळी रामानंद सागर यांनी विभीषण यांच्या भूमिकेसाठीही त्यांचं ऑडिशन घेतलं होतं. ही ऑडिशन त्यांनी अगदी चोख दिली होती, म्हणूनच त्यांची निवड करण्यात आली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. परंतु नऊ वर्षांपूर्वी 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळला होता. जेव्हा या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, तेव्हा त्यात एक व्यक्ती रेल्वे रुळांवर उडी मारताना दिसून आली होती. पोलिसांनी या घटनेला अपघात नव्हे तर आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश रावल यांच्या कुटुंबीयांनी मात्र त्यांच्या आत्महत्येच्या शक्यतेला स्पष्ट नाकारलं होतं. ते सकाळी बँकेतून पैसे काढून थेट त्यांच्या ऑफिसला जाणार होते, असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु मुकेश ऑफिस किंवा घरी परतलेच नव्हते. रेल्वे रुळांवर त्यांचा मृतदेह आढळला होता. या घटनेनं त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.