TMKOC: शूटिंग नसताना ‘तारक मेहता..’चा सेट अगदी भुताटकीसारखाच..; बबिताने दाखवली झलक
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता..' या लोकप्रिय मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दता हिने सोशल मीडियावर सेटवरील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो गोकुळधाम सोसायटीचा गजबजलेला परिसर, जेठालालचा धिंगाणा, बबिता अय्यर आणि इतर कलाकारांची धमाल. मात्र, शूटिंग सुरू नसताना याच गोकुळधामचा लूक पूर्णपणे बदलतो. मालिकेतील बबिता अय्यर अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने चाहत्यांना या शांत आणि काहीशा वेगळ्या सेटची झलक दाखवली आहे. मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा सेट पूर्णपणे रिकामा दिसत आहे. नेहमी कलाकार आणि क्रू मेंबर्सच्या वर्दळीने गजबजलेला हा सेट शूटिंग नसताना अगदी शांत दिसतो. याच कारणामुळे मुनमुनने मजेशीर अंदाजात हा सेट ‘भुताटकीसारखा’ वाटत असल्याचं म्हटलं आहे.
मुनमुन दत्ता या मालिकेचा सुरुवातीपासूनच भाग आहे. गेल्या जवळपास 18 वर्षांपासून ती बबिता कृष्णन सुब्रमण्यम अय्यर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यामुळे गोकुळधामचा सेट तिच्यासाठी केवळ कामाची जागा राहिलेला नाही, तर तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. मुनमुनने सांगितलं की, शूटिंगच्या मध्ये मिळणाऱ्या वेळेत ती अनेकदा सेटवर फिरते आणि जुन्या आठवणींना उजाळा देते. या जागांमधून फिरताना आपलं आयुष्यच या सेटवर वाढल्याची जाणीव तिला होते. इतकी वर्षे या मालिकेचा भाग राहण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने स्वतःला भाग्यवान असल्याचंही म्हटलं आहे.
मुनमुनने या पोस्टमध्ये ‘सावन बीतो जाए’ हे गाणंही वापरलं. हे गाणं तिच्या मनाच्या खूप जवळ असल्याचं तिने सांगितलं असून, ते ऐकल्यावर आजही तिच्या डोळ्यांत पाणी येतं, अशी भावना व्यक्त केली. सेटवरील एका फोटोला तिने ‘उदासीनता आणि शांततेच्या मधला क्षण’ असा भावनिक संदर्भ दिला. दरम्यान, मालिकेच्या 18 वर्षांच्या प्रवासादरम्यान मुनमुनने शोमधील महिला कलाकारांच्या महत्त्वाबद्दलही भाष्य केलं होतं. महिलांचा शो आणि त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचं तिने सांगितलं.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अठरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. यातील प्रत्येक भूमिकेनं आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.