16 वर्षीय लहान गायिकेशी लग्न केल्याने संगीतकार ट्रोल; म्हणाला “त्रास झाला, वाईटही वाटलं..”
50 वर्षीय संगीतकाराने 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न केल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड टीका केली. या टीकेवर आता संगीतकार रघु दीक्षितने प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी रघु दीक्षितने दुसरं लग्न केलं होतं.

प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी दुसरं लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. 34 वर्षीय ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी लग्न केल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आपल्यापेक्षा वयाने 16 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केल्यामुळे नेटकऱ्यांनी रघुवर टीका केली होती. या ट्रोलिंगवर अखेर त्याने मौन सोडलं आहे. अशा गोष्टींकडे मी गांभीर्याने पाहत नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रघु म्हणाला, “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, याची आम्हाला कल्पना होतीच. जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असता, तेव्हा लोक तुमच्याबद्दल वेगवेगळी मतं बनवतातच. सुरुवातीला आम्हाला त्रास झाला आणि वाईटही वाटलं. पण त्यातही चांगलं आणि आनंदी आयुष्य जगण्याची एक छोटीशी ट्रिक आहे. ते म्हणजे इंटरनेटवरील गोष्टींकडे फार गांभीर्याने पाहू नका. ऑनलाइन लोक काय म्हणतात, यापेक्षा कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि खऱ्या चाहत्यांचं मत माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.”
वरीजाश्रीशी लग्न करण्याबद्दल तो पुढे म्हणाला, “तुम्हाला माहीत आहे का, प्रेम ही अत्यंत विलक्षण गोष्ट आहे. ते डोळ्यांना न दिसणारं सौंदर्य पाहतं. ते आपोआपच घडतं. एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आमच्यात खूप काळापासून मैत्री होती. त्यामुळे जेव्हा आम्ही लग्न केलं, ते खूप स्वाभाविक वाटलं. जर तुमचे निर्णय प्रेम, परस्पर आदर आणि विश्वासावर आधारित असतील, तर बाहेरील गोष्टी तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. आम्हा दोघांनाही एकत्र वेळ घालवणं, संगीतावर काम करणं, प्रवास करणं आणि एकमेकांना स्वत:च्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य द्यायला आवडतं. जरी आम्ही दोघं संगीताशी घट्ट जोडलेलो असलो तरी आमचं लग्न हे आमच्या करिअरपेक्षा खूप अधिक महत्त्वाचं आहे. माझी पत्नी फक्त प्रतिभावान संगीतकारच नाही, तर ती व्यक्ती म्हणूनही अद्भुत आहे.”
रघुने याआधी 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी 2016 पासूनच दोघं वेगवेगळे राहत होते. यादरम्यानच प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने रघुवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.