
सोशल मीडिया, मालिका आणि चित्रपटांमधून बालकलाकार मायरा वायकुळ घराघरात पोहोचली. मायराने फार कमी वयात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. परंतु या सर्वांत कुठेतरी तिचं बालपण हरवत चाललंय, असं नेटकरी सतत म्हणतात. मायराला आणि तिच्या आईवडिलांना त्यावरून अनेकदा ट्रोलसुद्धा केलं जातं. लहानपणीच ती मोठ्यांसारखी बोलते आणि वागते, तिचं बालपण हरवलंय, अशी टीका नेटकरी करतात. सध्या मायराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणीबद्दल बोलताना दिसतेय. परंतु ज्याप्रकारे ती बोलते, ते पाहून नेटकरी पुन्हा तिला ट्रोल करू लागले आहेत.
“माझी एक मैत्रीण होती, जी ग्रेड वनपासून माझ्यासोबत होती. तिची वागणूक खूप बदलली. ती माझ्याशी खूप वाईट वागते. मी तिच्याशी अजून तशी नाही वागत. डॅडी मला असंच सांगत आले की, ती जर तुझ्याशी अशी वागत असेल आणि तू पण तिच्यासारखीच वागलीस, तर तुझ्यात आणि तिच्यात काय फरक राहणार”, असं मायरा या मुलाखतीत सांगते. त्यावर मुलाखत घेणारी व्यक्ती तिला सांगते, “मी तुला यावर एक वेगळा दृष्टीकोन सांगू का? कदाचित त्या मुलीचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील.” या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतक्या कमी वयात आयुष्य आणि प्रॉब्लेम्स याविषयी काय ताण द्यायचा, असं नेटकरी म्हणत आहेत.
या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी मायरा आणि तिच्या आईवडिलांना खूप ट्रोल केलंय. ‘वेळेच्या आधी आणि प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी किंवा यश मिळालं की असं होतं’, असं एकाने म्हटलंय. तर ‘घरूनच वाचून निघते वाटतं स्क्रिप्ट’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘ही मुलगी डोक्यातच जाते. वय काय आणि वागते काय? आमच्या आईवडिलांना आम्हाला हाणून काढलं असतं अशा चर्चा केल्या तर’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
‘करत असेल अॅक्टिंग चांगली पण जन्माला आल्यापासूनच रील्स आणि मग अॅक्टिंग यात या पोरीचं बालपण प्रौढ झालं. ती कधीच बालिश बोलत नाही. खूपच अति मॅच्युअर मुलीप्रमाणे वागत असते. जे तिच्या वयाला बिलकुल चांगलं नाही. पण हिच्या पालकांना हे कळत नाहीह. तिच्या भविष्यासाठी हे चांगलं नाही,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.