
साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मोठा मुलगा नाग चैतन्यने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनी याने यावर्षी मुस्लीम गर्लफ्रेंड झैनब रावदजी हिच्याशी लग्नगाठ बांधली. अक्किनेनी कुटुंबाने हिंदु आणि इस्लाम अशा दोन्ही धर्माच्या सुनांचं स्वागत केलं आहे. परंतु दोन धर्मांमुळे कुटुंबात काही वाद होतात का किंवा एकमेकांना समजून घेताना काही अडचणी येतात का, याविषयी नागार्जुन यांची पत्नी अमाला अक्किनेनी मोकळेपणे व्यक्त झाल्या. “माझ्या दोन्ही सुनांनी घरात आनंद आणि आपलेपणाची भावना आणली. सासू बनून मी खूप खुश आहे”, असं त्या म्हणाल्या.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, “माझी मोठी सून सोभिता अत्यंत प्रतिभावान आणि स्वतंत्र विचारांची आहे. ती खूपच प्रेमळ आहे. आम्ही तिचा खूप आदर करतो. मला तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. तर दुसरीकडे माझी छोटी सून झैनब अत्यंत उत्साही आहे. ती तिच्या क्षेत्रात यशस्वी आहे. घरात इतकं प्रेम आणि आनंद आहे की मन भरून येतं. इतक्या चांगल्या मुली भेटणं हा आमच्यासाठी एक आशीर्वाद आहे.”
कुटुंबात कोणकोणते धर्म पाळले जातात, याविषयी सांगताना त्या पुढे म्हणाल्या, “हिंदू घरात तिच्यासाठी गोष्टी कशा कम्फर्टेबल केल्या जाऊ शकतात, हे आम्हाला झैनबने शिकवलं. आमच्या कुटुंबात वेगवेगळ्या धर्माचं पालन करणारे सदस्य आहेत. परंतु प्रत्येकजण एकमेकांच्या धर्माचा आणि श्रद्धांचा मनापासून आदर करतो. माझी आई कॅथलिक होती. पण नंतर तिने सूफी धर्म स्वीकारला. माझे वडील हिंदू होते. तर सासरे नागेश्वर राव गारू यांचा कोणताही धर्म नव्हता. पण त्यांना नास्तिकही म्हणता येणार नाही. ते म्हणायचे की काम हीच माझी पूजा आहे. त्यांनी कधीच कोणते धार्मिक विधी पाळले नाहीत. स्वत:चं काम प्रामाणिकपणे करणं आणि स्वत:च्या मूल्यांचं पालन करणं हेच अध्यात्म असल्याचं त्यांचं मत होतं. ते धार्मिक नव्हते, परंतु मूल्यांना खूप महत्त्व द्यायचे.”
अमला अक्किनेनी या स्वत: बौद्ध धर्माच्या शिकवणींचं पालन करतात. “मी विपश्यना करते आणि बुद्धांच्या शिकवणींचं पालन करते. आता इस्लामदेखील आमच्या घराचा भाग बनत असल्याने हा एक सुरेख संगम निर्माण झाला आहे. आम्ही सर्वजण एकमेकांच्या श्रद्धांचा आदर करतो. मला पूजेचे बरेच नियम माहीत नाहीत, पण त्यामागील अर्थ मला समजतो. मी संस्कृत शिकले, त्यामुळे वैदिक मंत्रांचा जप करणं मला सहज जमतं. वेद मला नियमांसारखं नाही तर ज्ञानासारखं वाटतं. मी फक्त दिवा लावते आणि मंत्रजाप करते. मी स्वत:ला नशिबवान समजते की मला स्वत:चा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आहे”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.