Nana Patekar Final Rites : असा नट होणे नाही…नाना पाटेकर अनंतात विलीन, ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड

Nana Patekar Final Rites : नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं असून आज त्यांच्यावर पुण्यातील डोणजे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nana Patekar Final Rites : असा नट होणे नाही...नाना पाटेकर अनंतात विलीन, नटसम्राट काळाच्या पडद्याआड
| Updated on: Oct 08, 2026 | 11:32 PM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानं मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते, कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे. नाना पाटेकर यांचं पार्थिव गोवा येथील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या दिशेनं रवाना करण्यात आलं. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुलगा मल्हार पाटेकर आणि पत्नी निलकांती पाटेकर उपस्थित होते. यावेळी नानांचं कुटुंबीय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

डोणजेतील फार्महाऊसवर अंत्यसंस्कार

Loading...

नाना पाटेकर यांचं पुण्याजवळील डोणजे येथे फार्महाऊस आहे. या ठिकाणाशी त्यांचं विशेष जिव्हाळ्याचं नातं होतं. नाना पाटेकरांवर याच फार्महाऊसच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाकडून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली. आता नाना पाटेकर अनंतात विलीन झाले आहेत. नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्कारांला उपमुख्यमंत्र्यांसह इतर राजकीय नेते उपस्थित होते. नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान मकरंद अनासपुरे यांनाही अश्रू अनावर झाले.

गोव्यात घेतला अखेरचा श्वास

नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी होते. गुरुवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यानं सकाळी सुमारे ५.२० ला त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

अभिनयासोबत सामाजिक कार्याचीही ओळख

नाना पाटेकर यांनी मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त आणि शेतकरी कुटुंबांसाठी विविध उपक्रम राबवले. नाना पाटेकर यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीनं एक प्रभावी आणि संवेदनशील अभिनेता गमावला आहे. त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us