सोन्याचे दर धाडधाड कोसळले; कारण काय? पंतप्रधान मोदींनी लखनऊमध्ये केला मोठा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊमधील कौशल दीक्षांत समारोहात सोने खरेदीबाबत केलेल्या आवाहनाचा उल्लेख केला. लोकांनी सोने कमी खरेदी केले आणि त्यामुळे सोन्याचे दर घसरल्याचा दावा त्यांनी केला.

सोनं खरेदी करायचं म्हटलं की अनेक जण आधी बजेटचा विचार करतात. सोन्याचे भाव वाढले की खरेदी करावी की थांबावं, असा प्रश्नही पडतो. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. ‘मी सांगितलं म्हणून तुम्ही सोनं कमी खरेदी केलं आणि तुमचे पैसे वाचले’, असं म्हणत त्यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली. आता आणखी एक वर्ष सोनं खरेदी करू नका, असं मोदी म्हणाले. लखनऊमध्ये झालेल्या कौशल दीक्षांत समारोहात ते बोलत होते.
‘माझं ऐकलं आणि तुमचे पैसे वाचले’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, वर्षभरापूर्वी मी देशातील लोकांना एक आवाहन केलं होतं. खूप गरज नसेल तर एक वर्ष सोनं खरेदी करू नका, असं मी सांगितलं होतं. लोकांनीही माझं ऐकलं आणि सोन्याची खरेदी कमी केली. त्यामुळे लोकांचे पैसे वाचले, असं मोदी यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचाही उल्लेख केला. शास्त्री यांनी देशातील लोकांना आठवड्यातून एक वेळचं जेवण सोडण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी लोकांनी त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला होता. आजही देशातील लोक एखाद्या आवाहनाला तितक्याच चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात, असं मोदी म्हणाले.
‘आज अनेक लोक मला सांगतात की, मोदीजी तुम्ही सांगितलं होतं, आम्ही तुमचं ऐकलं आणि आमचे पैसे वाचले’, असंही मोदी यांनी सांगितलं. त्याचवेळी त्यांनी आता आणखी एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आहे.
आयटीआयचे विद्यार्थीही देशाची मोठी ताकद
या कार्यक्रमात मोदी यांनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांचंही कौतुक केलं. सकाळी मी आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये होतो आणि आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, ऊर्जा आणि काहीतरी मोठं करण्याची जिद्द सारखीच आहे, असं ते म्हणाले.
आयआयटी असो किंवा आयटीआय, माझ्यासाठी दोन्ही ठिकाणचे विद्यार्थी सारखेच आहेत. हे विद्यार्थी देशाची खरी संपत्ती आहेत आणि त्यांचा सन्मानही सारखाच आहे, असं मोदी यांनी स्पष्ट केलं. आयटीआयमध्ये शिकणाऱ्या तरुणांकडे वेगवेगळी कौशल्यं आहेत. या कौशल्यांचा उपयोग देशाच्या विकासासाठी होणार आहे. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात या तरुणांची भूमिका महत्त्वाची असेल, असंही त्यांनी सांगितलं.
