काहीही असो.., अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा 1 रुपया जास्तच फी घेणार, नाना पाटेकरांचा मानधनाबाबतचा भन्नाट किस्सा समोर
अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा एक रुपया जास्त मानधन नाना पाटेकर यांनी का मागितलं होतं? कमलेश सावंत यांनी सांगितला खास किस्सा. जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयाची आणि दमदार संवादफेकीची नेहमीच सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चा होते. त्यांच्या अभिनयाची छाप केवळ प्रेक्षकांवरच नाही तर सहकलाकारांवरही पडली आहे. ‘दृश्यम’ चित्रपटातील इन्स्पेक्टर गायतोंडे या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते कमलेश सावंत यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याबद्दलचा एक रंजक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी नाना यांनी त्यांच्यापेक्षा एक रुपया जास्त मानधन मागितल्याची आठवण त्यांनी ऐकल्याचे सांगितले.
‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत कमलेश सावंत यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. एका चित्रपटात त्यांनी नानांसोबत काम केले होते. मात्र त्यांच्यासोबत एकही सीन चित्रित करण्याची संधी मिळाली नाही याची खंत त्यांना आजही आहे.
यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल ऐकलेला एक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी नाना यांनी एक रुपया जास्त मानधन मागितल्याचे सांगितले जाते. त्यानुसार, अमिताभ बच्चन यांना एक कोटी रुपये मानधन मिळाले तर नाना पाटेकर यांनी एक कोटी एक रुपये मानधन घेतल्याची चर्चा होती. मात्र, हा किस्सा आपण ऐकला असून त्यातील सत्यतेबद्दल खात्री नसल्याचे कमलेश सावंत यांनी स्पष्ट केले.
नानांच्या संवादफेकीची प्रेक्षकांवर होती जादू
कमलेश सावंत यांनी नाना पाटेकर यांच्या दमदार संवादफेकीचेही कौतुक केले. त्यांच्या मते, नाना यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत संवादांना विशेष महत्त्व मिळवून दिले. त्यांच्या संवादफेकीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण होत असे आणि अनेकदा थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असे.
एकेकाळी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये नाना पाटेकर यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत होती. त्यांचे संवाद ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे. कमलेश सावंत यांच्या मते, अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर हे असे दोन कलाकार होते, ज्यांच्या संवादांच्या वेळी भरगच्च थिएटरमध्येही शांतता पसरत असे. प्रेक्षक त्यांच्या प्रत्येक संवादाची आतुरतेने वाट पाहत असत.
नाना पाटेकर यांची अभिनयशैली, आवाजातील धार आणि संवादफेक यांमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयाच्या आठवणी आजही सहकलाकार आणि चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.