Naseeruddin Shah: मी अभिमानाने सांगतो, मी दिमागी नक्षल.. नसीरुद्दीन शाह यांचा सरकारवर हल्लाबोल

Naseeruddin Shah: “तुम्ही तुमची पूर्ण ताकद लावा, आमच्या देशातील तरुणांची हिंमत मोडणार नाही,” अशा आशयाचं विधान करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. त्यांच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Naseeruddin Shah: मी अभिमानाने सांगतो, मी दिमागी नक्षल.. नसीरुद्दीन शाह यांचा सरकारवर हल्लाबोल
नसीरुद्दीन शाह
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2026 | 12:05 PM

Naseeruddin Shah: ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आले आहेत. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत स्वतःला ‘दिमागी नक्षल’ म्हणवून घेण्यास अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसंच देशातील तरुणांची हिंमत मोडण्याचे, शैक्षणिक संस्थांना कमकुवत करण्याचे आणि लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे प्रयत्न किती काळ सुरू राहणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानामुळे मनोरंजनविश्वासह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

‘मी अभिमानाने सांगतो, मी दिमागी नक्षल आहे’

नसीरुद्दीन शाह यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “मी अभिमानाने सांगतो की, मी दिमागी नक्षल आहे. माझ्यासारख्या लोकांना चौकीदाराने देशविरोधी, ‘टुकडे-टुकडे गँग’ आणि आणखी कोणकोणती विशेषणं दिली आहेत, माहीत नाही.” पुढे त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. देशातील तरुणांचा आत्मविश्वास मोडण्यासाठी, शिक्षणसंस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि लोकशाहीला धोक्यात आणण्यासाठी आणखी किती प्रयत्न केले जाणार, असा सवाल त्यांनी केला. सरकार आणि त्याच्या आसपास असलेल्या लोकांवर टीका करताना त्यांनी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नांवरही नाराजी व्यक्त केली.

Loading...

पहा व्हिडीओ-

या व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), कोलकात्यातील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय) आणि जामिया मिलिया इस्लामिया या शैक्षणिक संस्थांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आधी जेएनयू, त्यानंतर सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूट आणि आता जामियामधील विद्यार्थ्यांसोबत जे घडत आहे, ते विसरले जाणार नाही. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कथित अन्यायाची नोंद घेतली जाईल, असंही त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी भाजपच्या आयटी सेलवरही टीका केली.

जामिया विद्यापीठात नेमकं काय सुरू आहे?

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनाचा मुख्य मुद्दा विद्यार्थी संघाच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याची मागणी हा आहे. जवळपास दोन दशकांपासून निवडणुका झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन आणि उपोषण सुरू केलं आहे. याशिवाय विद्यार्थ्यांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेणे आणि विद्यापीठ प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना पदावरून हटवणे, अशा मागण्याही आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ परिसरात तणाव कायम होता. विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून कारवाई झाल्याचे आरोप केले, तर विद्यापीठ प्रशासनानेही आंदोलन आणि परिसरातील परिस्थितीबाबत आपली भूमिका मांडली आहे.

व्हिडीओच्या शेवटी नसीरुद्दीन शाह यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. देशातील तरुणांचा आत्मविश्वास मोडता येणार नाही, शैक्षणिक संस्था नष्ट होणार नाहीत आणि लोकशाहीही सहज संपुष्टात येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us