कणकवलीबद्दल असं काही म्हणाले नसीरुद्दीन शाह, नेटकरी पडले पेचात ‘हे चांगलं बोलतायत की वाईट?’

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह एका मुलाखतीत कणकवलीबद्दल असं काही बोलून गेले, की ते ऐकल्यानंतर नेटकरीच पेचात पडले आहेत. ते कणकवलीबद्दल चांगलं बोलतायत की वाईट, हेच कळत नसल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

कणकवलीबद्दल असं काही म्हणाले नसीरुद्दीन शाह, नेटकरी पडले पेचात हे चांगलं बोलतायत की वाईट?
Naseeruddin Shah
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2025 | 3:20 PM

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या एका मुलाखतीची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नसीरुद्दीन शाह आणि त्यांची पत्नी-अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी एकत्र ही मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना कोणत्या शहरात परफॉर्म करायला आवडतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रत्ना यांनी बेंगळुरू आणि चेन्नई या दोन शहरांची नावं घेतली. त्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी कणकवली असं उत्तर दिलं. परफॉर्म करण्यासाठी कणकवली हे शहर का आवडतं, यामागचं कारणसुद्धा त्यांनी दिलं. परंतु त्यांचं हे कारण ऐकून ते कणकवलीबद्दल चांगलं बोलतायत की वाईट हेच कळत नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

“कणकवली ही अत्यंत कमालिची जागा आहे. गोव्याला जातानाच्या रस्त्यावर हे ठिकाण आहे. तिथे लॅटराइटच्या दगडांपासून बनवलेलं थिएटर आहे. टिनचं छत आहे आणि शामियानासारखं आहे. मधे-मधे थोडा उजेड पडतो आणि प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत. एक स्टेज आहे, ज्याला हिरवा रंग दिला आहे. का ते माहीत नाही. कणकवलीत बहुतांश अशी लोकं आहेत, जे निवृत्त सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि नाटकप्रेमी आहेत. तिथे रात्री 8 वाजताचा शो 9.30 वाजता शो सुरू होतो. लोक आरामात जेवून, पान वगैरे खाऊन येतात. त्यानंतर रात्री साडेनऊ, दहा वाजता आरामात शो सुरू होतो. रात्री बारा वाजता तो शो संपतो,” असं नसीरुद्दीन सांगतात.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हे नक्की कणकवलीबद्दल चांगलं बोलतायत की वाईट तेच कळत नाहीये’, असं एकाने लिहिलं. तर ‘कणकवली जशी पण आहे, आम्हाला प्रिय आहे’, असं दुसऱ्यांनी म्हटलंय. ‘आमचा दशावतार नाटक रात्री 12 वाजता चालू होता. त्याचीच सवय हा आमका’ अशा कोकणी अंदाज नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. विविध मुद्द्यांवर ते बिनधास्तपणे त्यांची मतं मांडताना दिसून येतात. परंतु यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नसीरुद्दीन शाह यांनी 1982 मध्ये रत्ना पाठक शाह यांच्याशी लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत. इमाद शाह आणि विवान शाह अशी त्यांची नावं आहेत.