
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. यंदा विजेत्यांच्या यादीतील अनेक आश्चर्यकारक नावं समोर आली. बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. ‘जवान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा पुरस्कार त्याला विभागून देण्यात आला आहे. ‘बारवी फेल’ या चित्रपटातील मुख्य अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे. शाहरुखचं नाव जाहीर होताच जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या शाहरुखला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब राणी मुखर्जीने पटकावला आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार ‘बारवी फेल’, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदिप्तो सेन (द केरळ स्टोरी) आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले ‘बेबी’साठी (तेलुगू चित्रपट) साई राजेश नीलम यांना जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार जिंकणं हा कोणत्याही बक्षिसाच्या रकमेपेक्षा सर्वांत मोठा मान मानला जातो. तरीसुद्धा भारत सरकारकडून हा पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना ठराविक रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येतं. सर्वांत मोठी रक्कम दादासाहेब फाळे पुरस्कार विजेत्यांना दिली जाते. त्यांना मेडल, प्रमाणपत्र आणि त्यासोबत 15 लाख रुपये मिळतात. त्यानंतर सुवर्ण कमळ जिंकलेल्यांना 3 लाख रुपये दिले जातात. तिसऱ्या क्रमांकावर रजत कमळ विजेत्यांना 2 लाख रुपये मिळतात.
शाहरुख खान, विक्रांत मेस्सी आणि राणी मुखर्जी यांसारख्या कलाकारांना रजत कमळ पुरस्कार दिला जाईल. म्हणजेच त्यांना मेडल, प्रमाणपत्र आणि त्यासोबत दोन लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका यांना रजत कमळ दिलं जातं. या सर्वांना दोन लाख रुपये बक्षिस मिळतं.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय फिल्म यांसारख्या विभागातील विजेत्यांना सुवर्णकमळ दिलं जातं. त्याचसोबत त्यांना तीन लाख रुपये मिळतात.