‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीलाचा ‘हा’ डान्स पाहून एजेही पडेल प्रेमात!

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी लोंढेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील तिचा डान्स पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत.

नवरी मिळे हिटलरलामधील लीलाचा हा डान्स पाहून एजेही पडेल प्रेमात!
Raqesh Bapat and Vallari Londhe
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 21, 2024 | 4:24 PM

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. यामध्ये एजे आणि लीला ही दोन मुख्य पात्रं अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी लोंढे साकारत आहेत. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. लीलाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियावर वल्लरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती ‘छला छलका रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. वल्लरीचा सहजसुंदर डान्स, अदा पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. ‘लीलाला असं डान्स करताना पाहून एजेसुद्धा तिच्या प्रेमात पडेल’, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

राणी मुखर्जीवर चित्रित झालेल्या ‘छलका छलका रे’ या गाण्यावर वल्लरीने सुंदर डान्स केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हा डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘तू इतकी सुंदर का आहेस’, अशी कमेंट अभिनेत्री हृता दुर्गुळेनं केली आहे. तर ‘एक्स्प्रेशन क्वीन’ अशा शब्दांत एका युजरने कौतुक केलं आहे. ‘सहजसुंदर डान्स तुझ्या हावभावांमुळे आणखी छान वाटतोय’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

पहा व्हिडीओ

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका मुलाखतीत वल्लरीने तिच्या प्रोमोच्या शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा सांगितला. ती म्हणाली, “माझी लीलाच्या भूमिकेसाठी निवड एकदम अनपेक्षित होती. मला फोन आला आणि दोन दिवसात तू ऑडिशनला ये असं सांगितलं गेलं. मी जाऊन ऑडिशन दिली आणि तीन-चार दिवसात मला फोन आला की माझी निवड झाली आहे. माझा विश्वास बसत नव्हता की पहिल्याच ऑडिशनमध्ये माझी निवड झाली आहे. राकेश बापटसोबत माझी पहिली भेट एका लूक टेस्टसाठी झाली होती. मला टेन्शन तर होतंच कारण लीलाचे खूप डायलॉग आहेत आणि त्यात राकेश बापट तुमच्यासमोर आहेत तर प्रेशर येणारच. कारण केमिस्ट्री मॅच झाली तरच लोकांना मालिका पाहायला आवडेल. पण त्यांना जेव्हा भेटले तेव्हा कळलं की ते अतिशय साधे आहेत. आमचं लूक टेस्टही छान झालं. लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम मिळत आहे, म्हणून माझी उत्सुकता अजून वाढली आहे.”