नुसरत फतेह अली खान यांनी रडत-रडत गायलेलं गाणं, रेकॉर्डिंग दरम्यान नेमकं काय घडलेलं?
नुसरत फतेह अली खान यांनी रडत-रडत गायलेलं हे गाणं. प्रदर्शित होताच ठरलेलं प्रचंड लोकप्रिय. अनेक वर्षानंतर समोर आला किस्सा. नेमकं काय होतं कारण? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक गाणी त्यांच्या संगीतामुळे, गायकांमुळे आणि त्यांमधील डान्स आणि रोमँटिक सादरीकरणामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. असंच एक प्रसिद्ध गाणं जे नुसरत फतेह अली खान गाताना त्यांच्या डोळ्यात होते अश्रू.
प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटाशी संबंधित एक जुनी आणि भावनिक आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताच्या रेकॉर्डिंगदरम्यान प्रसिद्ध पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात वेदना आणि अश्रूंची भावना जाणवत होती. यामागचे कारण होते ज्येष्ठ संगीतकार आर. डी. बर्मन यांचे निधन. नुसरत हे आर. डी. बर्मन यांच्या संगीताचे मोठे चाहते होते. त्यांच्या निधनामुळे ते प्रचंड भावूक झाले होते.
शेखर कपूर यांनी इन्स्टाग्रामवर हा खास किस्सा सांगितला आहे. त्यांनी म्हटले की, ‘बँडिट क्वीन’च्या बॅकग्राउंड स्कोअरचे रेकॉर्डिंग सुरू असताना नुसरत फतेह अली खान यांनी त्यांना एक अनोखी विनंती केली होती. नुसरत म्हणाले होते, ‘शेखरजी, तुम्ही तुमचा चित्रपट पाहा आणि मी तुमच्या डोळ्यांत पाहून गाणार आहे.’ नुसरत यांची ही विनंती ऐकून शेखर कपूर यांनाही आश्चर्य वाटले होते.
त्या सीनमुळे नुसरत झाले भावूक
शेखर कपूर यांनी पुढे सांगितले की, ज्या सीनसाठी संगीताचे रेकॉर्डिंग सुरू होते, ते चित्रपटातील बेहमई हत्याकांडानंतरचे सीन होते. या दृश्यात एका रांगेत चिता दिसत होत्या. नदीकिनारी महिलांच्या रडण्याचे आणि आक्रोशाचे आवाज ऐकू येत होते.
रेकॉर्डिंग सुरू झाल्यानंतर शेखर कपूर यांच्या लक्षात आले की नुसरत फतेह अली खान त्यांच्या डोळ्यांत पाहून गात आहेत. ते केवळ त्यांच्याकडे पाहत नव्हते तर त्यांच्या डोळ्यांतून काहीतरी शोधत असल्याचा अनुभव शेखर यांना आला. नुसरत यांना शेखर कपूर यांचेही आर. डी. बर्मन यांच्याशी जवळचे नाते असल्याची जाणीव होती.
आर. डी. बर्मन यांच्या आठवणींनी जुळले भावनिक नाते
शेखर कपूर यांनी सांगितले की, आर. डी. बर्मन यांनी त्यांच्या पहिल्या ‘मासूम’ चित्रपटाला संगीत दिले होते. त्यामुळे शेखर कपूर आणि नुसरत फतेह अली खान या दोघांमध्येही आर. डी. बर्मन यांच्याबद्दल एक भावनिक नाते होते.