Video : ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’मधील गाण्यावर ऐश्वर्याचा आमिर खानसोबत जबरदस्त डान्स

आमिर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. जवळपास 18 महिने तो रुपेरी पडद्यापासून लांब राहणार आहे. कामातून काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना तो वेळ देणार असल्याचं आमिरने सांगितलं.

Video : दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगेमधील गाण्यावर ऐश्वर्याचा आमिर खानसोबत जबरदस्त डान्स
Aishwarya Rai and Aamir Khan
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 15, 2023 | 1:01 PM

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने नुकताच आपला 58 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. काहींनी आमिरचे जुने फोटो तर काहींनी व्हिडीओ पोस्ट केले. अशातच आमिरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान हा अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत डान्स करताना दिसतोय. आमिर आणि ऐश्वर्याने मोठ्या पडद्यावर कधीच एकत्र काम केलं नाही. त्यामुळे दोघांना अशा पद्धतीने एकत्र पाहून चाहते फार खुश झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्टेज शोदरम्यानचा आहे. यामध्ये ऐश्वर्याने लेहंगा परिधान केला आहे. तर आमिर खान कॅज्युअल अंदाजात दिसत आहे. शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटातील ‘तुझे देखा तो’ या गाण्यावर आमिर आणि ऐश्वर्याने ठेका धरला. हा व्हिडीओ बऱ्याच वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आमिर-ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते फारच उत्सुक झाले आहेत. अनेकांनी यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘या दोघांनी एकत्र चित्रपटात काम केलं पाहिजे’, अशी इच्छा नेटकऱ्यांनी व्यक्त केली. तर ‘मोठ्या पडद्यावर ही जोडी चांगली दिसेल’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

पहा व्हिडीओ

आमिर खानने मंगळवारी 58 वा वाढदिवस साजरा केला. गेल्या वर्षी त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र आता काही काळ अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचं त्याने जाहीर केलं. आमिर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. जवळपास 18 महिने तो रुपेरी पडद्यापासून लांब राहणार आहे. कामातून काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना तो वेळ देणार असल्याचं आमिरने सांगितलं.

तर दुसरीकडे ऐश्वर्या लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात झळकणार आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित या बिग बजेट चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाची पटकथा मणीरत्नम यांनी एलांगो कुमरावेल यांच्यासोबत मिळून लिहिली आहे. तर ए. आर. रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. मणीरत्नम यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून यात अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.