Operation Sindoor : अब मिट्टी में मिल जाओगे; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सेलिब्रिटींकडून प्रतिक्रियांचा वर्षाव

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले करत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेतला. याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं.

Operation Sindoor : अब मिट्टी में मिल जाओगे; ऑपरेशन सिंदूरनंतर सेलिब्रिटींकडून प्रतिक्रियांचा वर्षाव
ऑपरेशन सिंदूरवर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2025 | 8:18 AM

भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने हवाई हल्ला करून चोख प्रत्युत्तर दिलं. या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. या ऑपरेशन सिंदूरवर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जय हिंद सेना.. भारत माता की जय.. ऑपरेशन सिंदूर’ असे जयघोष या सेलिब्रिटींनी पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्या 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. देशातील विविध ठिकाणांहून हे पर्यटक पहलगामला फिरायल गेले होते. आता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून या हल्ल्याचा सूड घेतला आहे.

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्यने लिहिलं, ‘धर्म विचारून गोळ्या झाडल्या होत्या, आता मोठी किंमत चुकवावी लागेल. भारताच्या आत्म्यावर हल्ला केला, आता तुम्ही मातीत मिसळाल. जय हिंद, जय भारत. जय हिंद सेना.’ तर अभिनेता रितेश देशमुखने म्हटलंय, ‘जय हिंद सेना.. भारत माता की जय.. ऑपरेशन सिंदूर.’ दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी लिहिलं, ‘आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र.. आम्ही सर्वजण एकत्र आहोत.’

अभिनेत्री निम्रत कौरने लिहिलं, ‘आपल्या सैन्यासोबत आम्ही आहोत. एक देश, एक मिशन. जय हिंद. ऑपरेशन सिंदूर.’ तर गायक राहुल वैद्यने म्हटलंय, ‘देव आमच्या सैन्याचं रक्षण करो आणि दहशतवादाला संपवण्यात त्यांना यश मिळो. जय हिंद.’

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश मोदी सरकारकडे दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत होता. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना मारून निष्पाप लोकांच्या मृत्यूचा सूड घ्यावा, अशी सर्वांचीच इच्छा होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्यात लष्कर-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचाही समावेश आहे. भारताने असंही स्पष्ट केलंय की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेलं नाही. भारताने लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये खूप संयम दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं बारकाईने निरीक्षण केलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांना ‘युद्धाची कृती’ असं म्हटलंय. त्याचप्रमाणे त्यांच्या देशाला योग्य प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या कोणकोणत्या ठिकाणांवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले..

  1. बहावलपूरमधील दोन ठिकाणं
  2. मुरीदके
  3. मुझफ्फराबाद
  4. कोटली
  5. गुलपूर
  6. भिंबर
  7. चक अमरू
  8. सियालकोट