Oppenheimer | सेन्सॉरची कात्री लागू नये म्हणून ‘ओपनहायमर’मधील न्यूड सीनसाठी लढवली भन्नाट शक्कल

21 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील एका सीनमध्ये फ्लॉरेन्सला न्यूड दाखवण्यात आलं होतं. मात्र भारतीय प्रिंटमधील चित्रपटाच्या याच सीनमध्ये तिला काळ्या रंगाच्या ड्रेसने झाकण्यात आलं आहे. 'CGI'च्या मदतीने ही एडिटिंग करण्यात आली आहे.

Oppenheimer | सेन्सॉरची कात्री लागू नये म्हणून ओपनहायमरमधील न्यूड सीनसाठी लढवली भन्नाट शक्कल
Oppenheimer
Image Credit source: Youtube
| Updated on: Jul 25, 2023 | 11:32 AM

मुंबई | 25 जुलै 2023 : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाल्यापासून त्यावर वाद सुरू आहे. यातील एका इंटिमेट सीनदरम्यान अभिनेत्याच्या हातात भगवद् गीता असल्याचं पाहून भारतीय प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. इतकंच नव्हे तर या सीनविरोधात भारत सरकारकडून दिग्दर्शकाला पत्र लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर आता अभिनेत्री फ्लॉरेन्स पगच्या एका न्यूड सीनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. 21 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील एका सीनमध्ये फ्लॉरेन्सला न्यूड दाखवण्यात आलं होतं. मात्र भारतीय प्रिंटमधील चित्रपटाच्या याच सीनमध्ये तिला काळ्या रंगाच्या ड्रेसने झाकण्यात आलं आहे. ‘CGI’च्या मदतीने ही एडिटिंग करण्यात आली आहे.

भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानलं जातं. त्यांच्याच आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. अभिनेता सिलियन मर्फीने यामध्ये ओपनहायमर यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये रॉबर्ट ओपनहायमर यांच्या भूमिकेतील सिलियन मर्फी त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि मानसशास्त्रज्ञ जीन टॅटलॉकची भेट घेतो. ओपनहायमरच्या एक्स गर्लफ्रेंडची भूमिका फ्लॉरेन्स पगने साकारली आहे. या भेटीदरम्यान दोघं इंटिमेट होतात आणि त्यावेळी तिचा हा न्यूड सीन आहे. या सीनमध्ये दोघंही विवस्त्र असतात आणि एकमेकांशी गप्पा मारत असतात. भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हाच सीन एडिट करण्यात आला आहे. यामध्ये फ्लॉरेन्सच्या शरीराला काळ्या रंगाच्या ड्रेसने झाकलं आहे. हे सर्व सीजीआय तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलं आहे.

वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरीद्वारे देशात प्रदर्शित झालेल्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटासमोर सेन्सॉर बोर्डाकडून कोणतेच अडथळे निर्माण होऊ नयेत, म्हणून तो सीन आधीच एडिट करण्यात आला होता. निर्माते आणि डिस्ट्रिब्युटर्स यांनी मिळून हा निर्णय घेतला. अमेरिकेत ‘आर’ रेटिंग मिळालेला हा चित्रपट भारतात मात्र ‘U/A’ प्रमाणपत्रासह प्रदर्शित झाला आहे. अमेरिकेतील ‘आर’ रेटिंगचा चित्रपट म्हणजे 17 वर्षांखालील प्रेक्षक पालकांसोबत हा चित्रपट पाहू शकतात. ख्रिस्तोफर नोलनचा हा पहिला ‘आर’ रेटेड चित्रपट आहे.

भगवद् गीतेच्या सीनवरून वाद

चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान मुख्य कलाकाराच्या हातात भगवद् गीता पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी होत आहे. भारत सरकारचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी दिग्दर्शन नोलनला एक खुलं पत्र लिहिलं आहे. ‘चित्रपटातील भगवद् गीतेचा सीन म्हणजे हिंदू धर्मावरील त्रासदायक हल्ला आहे’, असं त्यांनी या पत्रात म्हटलंय. त्याचसोबत हा सीन जगभरातील थिएटर्समधून काढून टाकण्यास सांगितलं आहे.