
बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1988 मध्ये सुरू झालेल्या ‘महाभारत’ या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. परंतु या मालिकेतील कर्णासाठी नव्हे तर अर्जुनाच्या भूमिकेसाठी त्यांनी आधी निवड झाली होती. एका मुलाखतीत खुद्द पंकज यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला होता. अर्जुनाच्या भूमिकेसाठी पंकज हे दिग्दर्शकांची पहिली पसंत होते. परंतु एका गोष्टीसाठी त्यांनी थेट नकार दिल्याने त्यांना थेट मालिकेतूनच काढून टाकण्यात आलं होतं.
‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी सांगितलं होतं, “मी संवादलेखक राही मसूम रझा, भृंग तुपकारी आणि पंडित नरेंद्र शर्माजींसमोर माझं ऑडिशन दिलं होतं. त्या सर्वांना मी अर्जुनाच्या भूमिकेसाठी आवडलो होतो. आम्ही त्यावर होकार देत करारावर स्वाक्षरी केली. नंतर बी. आर. चोप्रा यांनी मला बोलावून सांगितलं की तुला बृहन्नलाचीही (अर्जुनाचंच एक रुप) भूमिका साकारावी लागणार आहे आणि त्यासाठी तुला मिशी काढावी लागेल. तेव्हा मी त्यांना थेट नकार देत म्हटलं होतं की, नाही.. मी हे करू शकत नाही. मी मिशी कापली तर अजिबात चांगला दिसणार नाही, असं त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी थेट सवाल केला की, तू अभिनेता आहेस की कोण? फक्त मिशीसाठी तू एवढ्या मोठ्या भूमिकेवर पाणी सोडतोय.”
फक्त मिशीसाठी अर्जुनाच्या भूमिकेला नकार देणं हा मूर्खपणा असल्याची कबुली नंतर पंकज यांनीसुद्धा दिली. परंतु नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. “त्यावेळी तो माझा मूर्खपणा होता. बी. आर. चोप्रा मला म्हणाले, इथून निघ आणि पुन्हा येऊ नकोस. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसबाहेर काढलं होतं. माझा करार फाडण्यात आला आणि त्यानंतर सहा महिने मी फक्त डबिंग करत फिरत होतो. नंतर चोप्रा यांनी स्वत:हून मला फोन केला आणि याचाल नशीब म्हणतात. मी कर्णची भूमिका साकारू शकेन का, असं त्यांनी मला विचारलंय. त्यावरही मी त्यांना पुन्हा विचारलं की, सर मला मिशी काढावी लागणार नाही ना? त्यांनी नकार देताच मी कर्णची भूमिका स्वीकारली. ती भूमिका माझ्या नशिबात होती”, असं पंकज यांनी सांगितलं.