आयुष्यात पहिल्यांदा असं वाटलं..; ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर परेश रावलकडून मोठी खंत व्यक्त
अभिनेते परेश रावल यांनी 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' हे दोन्ही चित्रपट पाहिले आणि त्यानंतर त्यावर मनमोकळी प्रतिक्रिया दिली. हे दोन्ही भाग पाहिल्यानंतर त्यांनी सर्वांत मोठी खंत बोलून दाखवली. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या..

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. अवघ्या 19 दिवसांत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 1500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर भारतात हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी ‘धुरंधर 2’चं तोंडभरून कौतुक केलं आहे. यात सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या क्रिकेटर्सचीही भर पडली आहे. आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी ‘धुरंधर : द रिव्हेंज’ पाहिल्यानंतर आपले विचार व्यक्त केले आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी खंत बोलून दाखवली.
काय म्हणाले परेश रावल?
याविषयी परेश रावल म्हणाले, “मी धुरंधरचा पहिला भाग दोन वेळा पाहिला आणि आता दुसरा भार एकदा पाहिला. मला पुन्हा एकदा हा दुसरा भाग पहायचा आहे. मी या चित्रपटात असायला पाहिजे होतं. आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय की मी यात असतो तर खूप मजा आली असती. या चित्रपटात ज्याप्रकारे कथा सांगण्यात आली आहे आणि मोठ्या पडद्यावर जे सादरीकरण करण्यात आलं, ते कमालीचं आहे.” परेश रावल यांनी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य धरसोबत काम केलं होतं. यामध्ये त्यांनी एनएसए गोविंद भारद्वाज यांची भूमिका साकारली होती.
सचिन तेंडुलकर, विराट कोहलीकडून कौतुक
याआधी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर अभिनेते राकेश बेदी यांना फोन करून त्यांच्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं. तर विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ‘आज मी हा चित्रपट पाहिला आणि मी हे सांगू शकतो की भारतात मला असा सिनेमॅटिक अनुभव पहिल्यांदाच आला आहे. या चित्रपटाने माझ्या मनातील प्रत्येक भावना जागृत केली आणि जवळपास चार तास मी क्षणभरही जागेवरून हललो नाही’, अशा शब्दांत विराटने त्याचा अनुभव सांगितला. विराटने अभिनेता रणवीर सिंहचंही कौतुक केलं आहे. ‘चित्रपटातील सर्वच कलाकार आपापल्या भूमिकेत चांगले दिसले, पण रणवीर.. या चित्रपटानंतर तू एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहेस आणि तुझा अभिनय अत्यंत उच्च दर्जाचा आहे. खरोखरंच अप्रतिम’, असं त्याने म्हटलंय.