कुणी नाची, कुणी बाजारबसवी म्हणतं..; लहान वयातच खंडोबाशी लग्न लावलेल्या ‘फुला’चा संघर्ष, ट्रेलर पाहून काही नेटकरी का चिडले?
एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा 'फुला' या चित्रपटात अधोरेखित करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वाघ्या-मुरळीची पारंपरिक संस्कृती, संगीतमय गोष्ट, एका स्त्रीचा संघर्ष ‘फुला’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. ‘फुला’च्या ट्रेलरचं काहींनी कौतुक केलंय, तर काहींनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. लहान वयातच खंडोबाशी लग्न लावलेली एक मुलगी, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व अशा कथासूत्रावर ‘फुला’ हा चित्रपट बेतला असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट आकार घेते.
जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरची सुरुवातच दमदार संवादाने होते. ‘पब्लिक म्हणजे देव’ असा समज घालून देणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा हा संवाद आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये ‘फुला’ची एण्ट्री होते. यातील संवाद आणि गाणी उत्तम असली तरी काही गोष्टी काही नेटकऱ्यांना खटकल्या आहेत. ‘कथा चांगली वाटतेय, परंतु जरा अजून प्रगल्भ हवी होती. दिग्दर्शन आणि एडिटिंग बरोबर वाटत नाही’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर ‘अशा विषयावर चित्रपट बनवण्याची काय गरज होती’, असा सवाल दुसऱ्याने केला आहे. काहींना मात्र चित्रपटाचा विषय खूप आवडला आहे. एकंदरीत ‘फुला’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय.
पहा ट्रेलर-
देखण्या दृश्यप्रतिमा, नव्या असलेले कसदार कलाकार, अस्सल संगीताचा बाज या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. एकीकडे एआयसारख्या तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना अजूनही परंपरांचा किती खोल पगडा समाजावर आहे याचा विरोधाभास हा चित्रपट अधोरेखित करतो. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्य़ा धाटणीच्या चित्रपटात सात गाणी, टीझरला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आता अधिकच उत्सुकता निर्माण केली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे सारख्या ग्रामीण भागात या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. संगीतमय पद्धतीनं मांडलेला संघर्ष या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.
पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचंच आहे. चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे.