भर कार्यक्रमात अल्लू अर्जुनने वापरलेल्या ‘त्या’ शब्दावर आक्षेप; थेट पोलिसांत तक्रार

'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधीच अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भर कार्यक्रमात अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांसाठी वापरलेल्या शब्दावर आक्षेप घेण्यात आला आहे.

भर कार्यक्रमात अल्लू अर्जुनने वापरलेल्या त्या शब्दावर आक्षेप; थेट पोलिसांत तक्रार
Allu Arjun at Pushpa 2 trailer launch event
Image Credit source: ANI
| Updated on: Dec 02, 2024 | 10:10 AM

अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट येत्या 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. मात्र प्रदर्शनापूर्वी अल्लू अर्जुनसमोर एक समस्या निर्माण झाली आहे. त्याच्याविरोधात श्रीनिवास गौड नावाच्या एका व्यक्तीने हैदराबादमधील जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अल्लू अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांना ‘आर्मी’ म्हणून हाक मारतो. मात्र ‘पुष्पा 2’निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्याने चाहत्यांना मारलेल्या याच हाकेवरून संबंधित व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.

अल्लू अर्जुनविरोधात पोलिसांत तक्रार

अल्लू अर्जुनविरोधात तक्रार करणारे श्रीनिवास हे ‘ग्रीन पीस एनवायर्नमेंट अँड वॉर हार्वेस्टिंग फाऊंडेशन’चे अध्यक्ष आहेत. “आम्ही टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुनविरोधात तक्रार केली आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ‘आर्मी’ हा शब्द न वापरण्याची आम्ही विनंती केली आहे. आर्मी हे अत्यंत आदराचं पद आहे. तेच आमच्या देशाची रक्षा करतात. त्यामुळे तुम्ही चाहत्यांशी तो शब्द वापरू शकत नाही. त्यांच्यासाठी इतर अनेक शब्द आहेत,” असं ते म्हणाले.

अल्लू अर्जुन नेमकं काय म्हणाला?

‘पुष्पा 2’च्या प्रमोशननिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अल्लू अर्जुन म्हणाला, “माझे चाहते नाहीत, माझी आर्मी आहे. मी माझ्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो. माझ्यासाठी ते एका कुटुंबासारखेच आहेत. ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात, माझ्या आनंदात सहभागी होतात, जल्लोष साजरा करतात. ते माझ्या बाजूने आर्मीसारखेच खंबीर उभे राहतात. मी तुम्ही सर्वांवर खूप प्रेम करतो. तुम्हाला माझा आणखी अभिमान वाटेल असं काम मी भविष्यातही करत राहीन. हा चित्रपट जर खूप हिट ठरला तर मी त्याचं श्रेय माझ्या चाहत्यांना देईन.” श्रीनिवास यांनी त्यांच्या तक्रारीत अल्लू अर्जुनने वापरलेल्या ‘आर्मी’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे.

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सीक्वेल आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्या चित्रपटातील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.